घाटी रुग्णालयात ‘लेडी मुन्नाभाई’ला सुरक्षारक्षकांनी पकडले, पोलिसांनी सोडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 04:56 PM2021-12-31T16:56:26+5:302021-12-31T16:58:13+5:30
पैसे उकळत असल्याचे समजल्यावरून ॲप्रन घातलेल्या तरुणीला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले, घटनेची रुग्णालयात एकच चर्चा
औरंगाबाद : डाॅक्टर, नर्स, रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टर असल्याचे भासवून पैसे उकळल्याच्या आरोपावरून गुरुवारी घाटी रुग्णालयात एका तरुणीला सुरक्षारक्षकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु तपासानंतर पोलिसांनी तिला सोडून दिले.
पैसे उकळत असल्याचे समजल्यावरून ॲप्रन घातलेल्या तरुणीचा सुरक्षारक्षकांनी ओपीडीत शोध घेतला. तेथे एका रुग्णाच्या नातेवाईकाने मला आताच पैसे मागितले आणि ती निघून गेली, असे सांगितले, तेव्हा सुरक्षारक्षक घाटीतून बेगमपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेले. तेथे ‘ती’ दिसली. सुरक्षारक्षकांना पाहून तिने पळ काढला. सुरक्षा पर्यवेक्षक अरविंद घुले, रामेश्वर नागरे, गणेश राठोड, जिज्ञेश पाटील यांनी पाठलाग करून तिला पकडले. तिला सुरक्षारक्षक (एमएसएफ) कार्यालयात आणून चौकशी केली, तेव्हा तिने मी मागील ८ ते ९ महिन्यांपासून घाटीतील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून ७० ते एक लाख रुपये घेतल्याचे सांगितले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी पुढील कारवाईसाठी तिला पोलिसांच्या स्वाधीन केले.
४ ते ५ महिन्यांपासून शोध
मी डॉक्टर आहे, मला परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, माझे एटीएम ब्लॉक झाले, तुम्ही मला नगदी पैसे द्या मला, मी तुम्हाला फोन पे करते, किंवा मी उद्या तुम्हाला देते, असे सांगून मुलीने अनेकांकडून पैसे घेतले. याविषयी तक्रारी काही नातेवाईकांनी सुरक्षारक्षक कार्यालयात, वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात केल्या होत्या. गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून या मुलीचा शोध सुरक्षारक्षक घेत होते, अशी माहिती घाटीतील सुरक्षा अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
अंतर्गत प्रश्न म्हणून सोडून दिले - बेगमपुरा पोलीस
एका महिलेला सुरक्षारक्षकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चौकशीत ती मुलगी एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित विभागातील एका महिला डॉक्टरने ठाण्यात येऊन हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले. संबंधित प्रकरणाविषयी कोणाचीही तक्रार नव्हती. त्यामुळे तिला सोडून देण्यात आले, अशी माहिती बेगमपुरा पोलिसांनी सांगितले.