...अन् पीएसआयला बीपी वाढल्यामुळे आली भाेवळ
By राम शिनगारे | Published: October 1, 2023 09:27 PM2023-10-01T21:27:35+5:302023-10-01T21:27:43+5:30
बदली केली नसल्याचा दावा : सिडको ठाण्याच्या स्टेशन डायरीत नोंद
छत्रपती संभाजीनगर : सिडको ठाण्यात कर्तव्यावरील पोलिस उपनिरीक्षकांना मंत्र्यांचा पीए असल्याचे सांगून नांदेडकर नावाच्या व्यक्तीने ठाण्यातच आरडाओरड करीत गोंधळ घातला. या घटनेची स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली. त्यानंतर उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे यांना थेट पोलिस आयुक्तालयातुन बोलावणे आले. त्याठिकाणी पोहचल्यानंतर त्यांच्यासमोर नियंत्रण कक्षात रुजू होण्याचे आदेश हातावर ठेवला. हा आदेश स्विकारण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर वादावादी झाल्यामुळे त्यांचा बीपी वाढला. त्यातच त्यांना भोवळ आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिडको पोलिस ठाण्यातील स्टेशन डायरीतील नोंदीनुसार उमेश भुसारी हे ३० सप्टेंबरला सिडको ठाण्यात गेले होते. ते झोमॅटो डिलीवरी बाॅय म्हणून काम करतात. त्यांना मध्यरात्री एन-८, सिडकोतील सरकारी दवाखान्यासमोर आडवून दोघांनी पार्सल खाण्यासाठी दे म्हणत मारहाण केली होती. त्याबाबत त्यांना तक्रार द्यायची होती. ते ठाण्यात गेले तेव्हा त्याठिकाणी ड्यूटी अधिकारी उपनिरीक्षक शिंदे या एक तक्रार नोंदवून घेत होत्या. त्यामुळे भुसारी यांना थोडे थांबण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळातच एका कामानिमित्त नांदेडकर नावाचे व्यक्ती ठाण्यात आले. तेथे भुसारी यांनी त्यांना हा प्रकार सांगितला. तेव्हा नांदेडकर यांनी उपनिरीक्षक शिंदे यांच्यासमोर जात तुम्ही तक्रार का घेत नाही?, तुम्हाला बोलण्याची पद्धत आहे का?, मी कोण आहे हे माहिती आहे का?, मी आ. सावे यांचा पीए आहे. साहेबाकडे तुमची तक्रार करतो, असे म्हणून शिंदे यांच्यावर मंत्री सावे यांच्या नावाचा दबाव टाकला. या पद्धतीची नोंदही स्टेशन डायरीत केली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात उलटसुलट चर्चा करण्यात येत आहे.
बदली केलेली नाही
दरम्यान, पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांना याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, संबंधित पोलिस उपनिरीक्षकास काय घटना घडली आहे. याविषयीची माहिती घेण्यासाठी पोलिस आयुक्तालयात बोलावले होते. त्यांच्या बदलीचा आदेश काढलेला नाही. त्यांची बदली केलेली नाही. त्यांची प्रकृती ठिक असून, खाजगी रुग्णालय प्रशासनासोबतही बोलणे झाले आहे.