जालना रोडचे झाले तळे; नॅशनल हायवे ॲथॉरिटीने केलेला १३ कोटींचा खर्च खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 02:10 PM2021-09-08T14:10:45+5:302021-09-08T14:23:24+5:30
Rain in Aurangabad : कनेक्टिव्हिटी नसणे, काम अर्धवट असण्याचा फटका सामान्य औरंगाबादकरांना बसला.
- विकास राऊत
औरंगाबाद : नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) जालना रोडवरील साचणारे पाणी वाहून नेण्यासाठी १३ कोटींतून बांधलेल्या साइड ड्रेनचा खर्च खड्ड्यात गेल्याचे मंगळवारी रात्री ( Rain in Aurangabad ) झालेल्या पावसाने सिद्ध केले. साइड ड्रेनमधून पाणी वाहून न गेल्यामुळे पूर्ण रोडवर पाणी तुंबल्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला. शिवाय रोडवर पाणी साचून राहिल्याने वाहने बंद पडली. त्या साइड ड्रेनला पूर्ण कनेक्टिव्हिटी न दिल्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबल्याची माहिती समोर आली आहे. मुकुंदवाडी, हायकोर्टसमोर, सेव्हन हिल, चिकलठाणा या भागात काम अर्धवट आहे. कनेक्टिव्हिटी नसणे, काम अर्धवट असण्याचा फटका मंगळवारी सामान्य औरंगाबादकरांना बसला. दोन फुटांहून अधिक पाणी रस्त्यावर साचल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ झाली. ( Lake on Jalna Road in Aurangabad; 13 crore spent by National Highway Authority in the pit)
दीड वर्षांपासून चिकलठाणा ते महावीर चौकापर्यंत जालना रोडच्या दोन्ही बाजूला साइड ड्रेन टाकण्याचे काम सुरू आहे. सृष्टी कन्स्ट्रक्शन प्रा.लि. ही संस्था ते काम करीत आहे. मिळेल त्या जागेत दीड बाय दीड मीटरचे काम कंत्राटदाराने केले आहे. अजूनही ते काम पूर्ण झालेले नाही. कमी पाऊस झाल्यास साइड ड्रेन पूर्ण भरून जाते. त्यामुळे त्यातून पाणी वाहून गेल्याचे दिसते; परंतु मंगळवारी झालेल्या पावसाने त्या कामाचे पितळ उघडे पाडले. जालना रोडवर कुठेही कनेक्शन न दिल्यामुळे त्यातून पाणी वाहून गेलेच नाही. रस्त्यावरील पाणी रोडच्या डाव्या बाजूंनी असलेल्या उतारावरून नागरी वसाहतींकडे वळले. त्यामुळे नवीन शहरातील अनेक भागांत पाणी तुंबले.
एनएचएआयचा दावा असा
एनएचएआयच्या सूत्रांनी दावा केला की, साइड ड्रेनचे काम पूर्ण होत आले आहे. कमी पाऊस झाला तेव्हा पूर्ण पाणी गेले. मंगळवारी रात्री पावसाचा जोर जास्त होता, त्यामुळे पाणी जाऊ शकले नाही. कनेक्टिव्हिटी न दिल्यामुळे त्या ड्रेन पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीच त्या साइड ड्रेन बांधलेल्या आहेत. त्याला इतर कुठलीही कनेक्टिव्हिटी दिलेली नाही. १८ महिन्यांत काम संपण्याची मुदत आहे. जमिनीखाली इतर युटिलिटी खूप आहेत. त्यामुळे कामाला उशीर होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा - महापालिका अगोदरच आर्थिक संकटात, त्यात तिसऱ्या लाटेचा आर्थिक भार