सातारा, देवळाई शिवारातील तलाव, विहिरींनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:04 AM2021-04-16T04:04:56+5:302021-04-16T04:04:56+5:30
वर्षभरात स्वाहा केले १०० माणसांचे प्राण काही आत्महत्या, काही अपघात : अग्निशमन विभागाने काढले शंभर मृतदेह बाहेर -साहेबराव ...
वर्षभरात स्वाहा केले १०० माणसांचे प्राण
काही आत्महत्या, काही अपघात : अग्निशमन विभागाने काढले शंभर मृतदेह बाहेर
-साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद: सातारा- देवळाई, गांधेली, बाळापूर, नक्षत्रवाडी, कांचनवाडी परिसरातील तलाव व विहिरी माणसाच्या जिवासाठी चटावल्यात, असे वाटावे इतपत त्यांनी बळी घेतले आहेत. वर्षभरात तब्बल १०० मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी या परिसरातील विहिरी, तलावातून बाहेर काढले आहेत. त्यातील अर्धेअधिक अपघात असून, आत्महत्याही तेवढ्याच आहेत.
निसर्गरम्य असलेल्या या परिसरात अनेक तळे, विहिरी आहेत. त्यातील अनेकांना कुंपन नाही. परिसरात फिरणारे सहज पाण्यात पडतात व त्यांचा बळी जातो. हा झोका लक्षात घेऊन प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रात जाण्याला बंदी घातली असली तरी त्याच क्षेत्रात रहदारीचे प्रमाण वाढले आहे. तलावातील नितळशार पाणी आणि उन्हामुळे अंगाची होणारी कायली यामुळे अनेकांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरता येत नाही. अनेकदा पोहता येत नसले तरी नवीन तलावातील खाचखळगी नवख्या व्यक्तीला माहीत नसते व त्यात त्यांना जीव गमावावा लागतो.
सातारा, देवळाई, वाल्मीच्या तलावात युवकांचे प्राण जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. प्रेमविरह असो अन्य कारणातून येणाऱ्या नैराश्यातून अनेक जण आत्मघाताचे पाऊल उचलतात. या परिसरातील विहिरी, तलावात ते आपले जीवन संपवितात. एप्रिल २०२० ते २०२१ दरम्यान सातारा- देवळाई, वाल्मी, नक्षत्रवाडी तसेच आसपासच्या विहीर, तलावात १०० जणांचा मृत्यू झाल्याचे भयावह सत्य अग्निशमन विभागाच्या नोंदीवरून समोर येते.
टण...टण...आवाज आला की धडकी....
टण...टण...आवाज करीत, सायरन वाजवित शहराच्या कोणत्याही रस्त्यावरून अग्निशमन विभागाची गाडी निघाली की, रस्त्यावरील नागरिक वाहने बाजूला सरकवून रस्ता तयार करून देतात. प्रत्येकाच्या नजरा त्या गाडीकडे वळताना दिसतात. सातारा, देवळाई शिवारात गाडी आली की नागरिकांना कुणी तरी पाण्यात बुडाल्याचा तो संदेशच असतो.
२०२० ते २१ एप्रिल वर्षभरात पाण्यातून काढलेले मृतदेह :
२०२०
एप्रिल -७
मे- ११
जून-१३
जुलै-१३
ऑगस्ट -४
सप्टेंबर- १६
ऑक्टो-७
नोव्हेंबर-५
डिसेंबर-४
२०२१ जानेवारी -३
फेब्रुवारी -४
मार्च- ५
एप्रिल- ८
एकूण- १००
धोकादायक क्षेत्र बोर्ड लावणार व पोलीस गस्तीसाठी पत्र..
गांधेली तसेच इतर तलावात कुणीही उतरू नये, धोकादायक क्षेत्र असल्याचे फलक तलावाच्या काठावर लावण्यात येणार आहे. पाण्यात उतरणाऱ्यावर कारवाई करण्याचे सुचविणार तसेच पोलीस ठाण्याला गस्तीसाठी ग्रामपंचायतीच्यावतीने पत्र देण्यात येणार आहे. शहर हद्दीत मनपा व इतरही ग्रामपंचायतीने हा निर्णय घ्यावा. - उपसरपंच अमोल तळेकर (गांधेली, ग्रामपंचायत)
पाण्यात उतरून शोध मोहीम...
पद्मपुरा आग्निशमन विभागाचे ड्युटी इंचार्ज मोहन मुंगसे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, २०२० एप्रिल ते २०२१ वर्षभरात सातारा- देवळाई, गांधेली, बाळापूर तसेच नक्षत्रवाडी, कांचनवाडी व परिसरात तलाव व विहिरीतून १०० मृतदेह बाहेर काढलेले आहेत. पाण्यातून शोधून काढताना दक्षता घ्यावी लागते. कारण परिसर नवखा असतो, असे सिडकोचे अग्निशमन प्रमुख विजय राठोड म्हणाले.
(फोटो कॅप्शन... तलाव असे भरलेले असल्याने उन्हात यात उतरणाऱ्यांना मज्जाव घालण्यासाठी फलक लावण्यात यावा.