कंपनीतून अडीच लाखांचे साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:31 PM2019-01-07T23:31:44+5:302019-01-07T23:31:59+5:30
वाळूज एमआयडीसीतील बी. आर. प्रेसिजीन या कंपनीतून चोरट्यांनी शेडमधील मशिनरी व साहित्य लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील बी. आर. प्रेसिजीन या कंपनीतून चोरट्यांनी शेडमधील मशिनरी व साहित्य लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या चोरीच्या घटनेत जवळपास अडीच लाखांचे साहित्य चोरट्यांनी लांबविल्याचा अंदाज कंपनी मालकाने केला आहे.
वाळूज एमआयडीसीतील के. सेक्टरमध्ये शशांक महाजन यांची बी. आर. प्रेसिजीन ही कंपनी आहे. या कंपनीत विविध प्रकारच्या मशिनरी, साठवण टाक्या व इतर साहित्य तयार करून आॅर्डरनुसार उद्योजक व विक्रेत्यांना पुरवठा करण्यात येतो. सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास महाजन हे कंपनीत आल्यानंतर आपल्या केबिनमध्ये गेले. त्यानंतर ८ वाजेच्या सुमारास कामगारांनी महाजन यांच्याकडे येऊन कंपनीच्या मोकळ्या शेडमध्ये ठेवलेल्या मशिनरी व इतर साहित्य गायब असल्याचे सांगितले. महाजन यांनी शेडची पाहणी केली. हा चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच महाजन यांनी कंपनीतील सुरक्षारक्षकाकडे चौकशी करून या घटनेची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. कंपनीच्या आवारात पावलाचे ठसे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हे साहित्य गेले चोरीस
एस. एस. मटेरियलची एक साठवण टाकी, शीट, अँगल, फ्लॅट, एम.एस.च्या २ बेस फ्रेम, एम. एस. स्ट्रॅक्चरचे ४ नग, १ पाईप, एम. एस.चॅनलचे १० नग आदी साहित्य चोरीस गेले आहे.