बँक खात्यात जमा झालेली लाखोंची रक्कम केली परत
By Admin | Published: August 11, 2015 12:43 AM2015-08-11T00:43:18+5:302015-08-11T00:55:45+5:30
औरंगाबाद : चुकून लाखो रुपये बँकेतील आपल्या खात्यात जमा होणे आणि ते प्रामाणिकपणे परत देणे, अशी घटना फारच विरळ. परंतु नजरचुकीने
औरंगाबाद : चुकून लाखो रुपये बँकेतील आपल्या खात्यात जमा होणे आणि ते प्रामाणिकपणे परत देणे, अशी घटना फारच विरळ. परंतु नजरचुकीने तब्बल २ लाख ६३ हजार रुपये खात्यात जमा झाल्यानंतर ग्राहकाने प्रामाणिकपणे ही रक्कम परत केल्याचा अनुभव एस.बी.आय. बँकेच्या एन-४, सिडको शाखेस आला.
सागर दत्तात्रय गोगे (रा. सिडको, एन-१ ) असे या ग्राहकाचे नाव आहे. एन-४ येथील एस.बी.आय. बँकेच्या शाखेतील त्यांच्या खात्यावर काही महिन्यांपूर्वी २ लाख ६३ हजार ५०० रुपये नजरचुकीने जमा करण्यात आले.
ही बाब गोगे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बँकेशी संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली. वेळोवेळी दूरध्वनी आणि पत्रव्यवहार करून त्यांनी ही चूक सुधारून रक्कम वळती करण्याची सूचना केली. बँकेच्या ‘सेंट्रलाईज्ड क्लिअरिंग प्रोसेसिंग सेंटर’च्या माध्यमातून ही चूक झाली होती. ही बाब लक्षात आल्यावर बँकेने रक्कम वळती करून घेतली.
बँक आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाच्या नात्याला वृद्धिंगत करणाऱ्या या घटनेने आदर्श निर्माण केला आहे. समाजात चांगुलपणावरील उडत चाललेला विश्वास पुन्हा निर्माण होण्यासाठी ही घटना प्रेरणादायी ठरणार आहे.