लाखो भाविक घृष्णेश्वरचरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:14 AM2018-02-14T00:14:17+5:302018-02-14T00:14:41+5:30
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री घृष्णेश्वरांचे मनोभावे दर्शन घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वेरुळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री घृष्णेश्वरांचे मनोभावे दर्शन घेतले.
सोमवारी मध्यरात्रीपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक वेरुळमध्ये सोमवारी रात्रीपासूनच दाखल होत होते. दर्शनासाठी रात्रीपासूनच आज दिवसभर रांगा कायम होत्या. गतवर्षीच्या तुलनेत भाविकांची गर्दी कमी दिसून आली.
भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे म्हणून बॅरिकेट्स लावण्यात आले होते. काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने भाविकांसाठी फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेत रहाटपाळणे, विविध साहित्यांची दुकाने व मनोरंजनाची साधने आली आहेत. घृष्णेश्वर महादेवाचा चांदीचा मुखवटा मंगळवारी सायंकाळी ४ वाजता वाजतगाजत पालखीतून वेरुळ येथील शिवालय तीर्थकुंडावर अभिषेक करण्यासाठीसाठी नेण्यात आला. तेथे पुजारी व समस्त गावकºयांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. हा क्षण डोळ्यात साठवून घेण्यासाठी भाविकांनी तीर्थकुंडावर मोठी गर्दी केली होती. तीर्थकुंडातील चलरूपी श्री घृष्णेश्वर महादेवाची पूजा संपल्यानंतर पालखी पुन्हा वाजतगाजत श्री घृष्णेश्वर मंदिरात नेण्यात आली.
यावेळी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष दीपक शुक्ला, विश्वस्थ कमलाकर विटेकर, राजेंद्र कौशिके, संजय वैद्य, योगेश टोपरे, सुनील शास्त्री, चंद्रशेखर शेवाळे, शाम शेवाळे, सुनील विटेकर, मंगेश पैठणकर आदींनी परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक हरिश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील, खासगी सुरक्षा रक्षक आदींनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
तीन महिन्यांत बसस्थानक करू -दिवाकर रावते
राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पहाटे श्री घृष्णेश्वरांचे दर्शन घेतले. पर्यटक आणि ग्रामस्थांच्या आग्रहास्तव वेरूळ येथे येत्या ३ महिन्यात बसस्थानक करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेक भाविकांचे मोबाईल, पर्स, मंगळसूत्र पळविले. परंतु ओरड झाल्यानंतर खुलताबादचे पोलीस निरीक्षक हरिश खेडकर यांनी चोरट्यांना लगेच पकडून भाविकांचे मोबाईल,पर्स, दागिने शहानिशा करून परत केले.