पैठण येथे लाखो भाविक नाथचरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:16 AM2018-03-08T00:16:09+5:302018-03-08T00:16:18+5:30
नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान बुधवारी ५ लाखांवर भाविक व वारक-यांनी नाथांच्या समाधीचे दर्शन घेतले असल्याचे नाथ संस्थानचे अध्यक्ष आ. संदीपान भुमरे यांनी सांगितले. महाराष्ट्रभरातून ५३७ दिंड्या पैठण शहरात दाखल झाल्याची नोंद न.प.कडे झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वारक-यांची संख्या वाढली असल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान बुधवारी ५ लाखांवर भाविक व वारक-यांनी नाथांच्या समाधीचे दर्शन घेतले असल्याचे नाथ संस्थानचे अध्यक्ष आ. संदीपान भुमरे यांनी सांगितले. महाराष्ट्रभरातून ५३७ दिंड्या पैठण शहरात दाखल झाल्याची नोंद न.प.कडे झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वारक-यांची संख्या वाढली असल्याचे दिसून आले. यंदा दिंडीसोबत वारकºयांची संख्या कमी असली तरी वाहनाने येणाºया वारकºयांच्या संख्येत मोठी वाढ झाली.
बोंडअळी व गारपिटीमुळे यंदा भाविकांची संख्या कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता; परंतु नाथांवर असलेली अपार श्रद्धा वारक-यांना रोखू शकली नाही. षष्ठीपूर्व नगर परिषदेच्या वतीने शहरातील अतिक्रमण काढून रस्ते मोकळे केल्याने व शहरात दाखल होणाºया रस्त्यांची कामे झाल्याने वारकºयांना सुटसुटीत रस्ते उपलब्ध झाले व वाहतूकही जाम झाली नाही.
स्वयंसेवी संस्थांचे कार्य
वारकरी व भाविकांना सेवा व सुविधा पुरवून प्रशासनास मदत होईल, असे महत्त्वपूर्ण काम विविध स्वयंसेवी संस्था करीत आहेत, त्यात मंदिर परिसरात दर्शन व्यवस्थेत सहकार्य करण्यासाठी ३२५ स्वयंसेवकांसह अनिरुद्ध अकॅडमी, यांच्यासह रामकृष्ण मिशन आश्रमचा मेडिकल कँप, स्वकाम सेवा मंडळाची स्वच्छता, जय बजरंग संघ, सावन कृपाल रुहानी मिशन, ज्येष्ठ नागरिक संघ, पाथर्डी, संत एकनाथ सेवा संघ, रेड स्वस्तिक व शांतिब्रह्म संत एकनाथ वारकरी सेवा प्रतिष्ठान यांचा समावेश आहे.
विजयी पांडुरंगास अभिषेक
आज फाल्गुन वद्य षष्ठी असल्याने पहाटे गावातील नाथ मंदिरात असलेल्या विजयी पांडुरंगास पंचामृत स्नान व अभिषेक नाथवंशजांच्या वतीने घालण्यात आले व विधिवत पूजा करून पुन्हा स्थानापन्न करण्यात आले. त्याचवेळी बाहेरील नाथ मंदिरातील संत एकनाथ महाराजांच्या समाधीची सुद्धा विधिवत पूजा करण्यात आली.
गोदापात्रात सोडले पाणी
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशान्वये नाथषष्ठीनिमित्त वारकरी व भाविकांना स्नानासाठी जायकवाडी धरणातून बुधवारी गोदापात्रात १०० क्युसेक्स दराने पाणी सोडण्यात आले. तीन दिवस पाण्याचा विसर्ग चालू राहणार असल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.