लाखो भाविकांनी घेतले भद्रा मारुतीचे दर्शन
By Admin | Published: April 23, 2016 01:11 AM2016-04-23T01:11:47+5:302016-04-23T01:23:18+5:30
खुलताबाद : श्रद्धास्थान असलेल्या येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
खुलताबाद : श्रद्धास्थान असलेल्या येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आलेल्या भाविकांनी भद्रा मारुतीचा जयघोष केल्याने खुलताबादनगरी शुक्रवारी दुमदुमली. जन्मोत्सव सोहळ्यासाठी शिवसेना उपनेते खा.चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष काशीनाथ बारगळ, सचिव कचरू बारगळ यांच्यासह विश्वस्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी गुरुवारी रात्रीपासूनच हजारो भाविक पायी खुलताबादकडे येत होते. रात्री दहा वाजेनंतर भाविकांचे जथेच्या जथे जय भद्राचा जयघोष करीत खुलताबादनगरीत दाखल होत होते. पायी येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी
चहापाणी, फराळाची व्यवस्था विविध सेवाभावी संस्था, संघटनांतर्फे करण्यात आली होती. भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा लागल्या होत्या. पहाटे हनुमान जन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर भाविकांनी दर्शन घेतले. औरंगाबादहून मोठ्या संख्येने पायी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था केली होती. हनुमान जयंतीनिमित्त भद्रा मारुती संस्थान येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप ह.भ.प. कैलासगिरी महाराज,( गिरी आश्रम सावखेडा, ता. गंगापूर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
दिवसभर भाविकांची गर्दी...
भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी शुक्रवारी दिवसभर भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. हार, पानफूल, नारळाची यावर्षी विक्रमी विक्री झाली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पोलिसांनी महिला आणि पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था केली. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून दर्शन रांगेत मंडप टाकण्यात आला होता. दर्शन व्हावे म्हणून संस्थानचे पदाधिकारी व स्वयंसेवक परिश्रम घेत होते.