‘बोलो प्यार से धन निरंकार’, संत समागमात लाखो भाविकांनी घडविले मानवतेचे विराट दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 01:30 PM2023-01-28T13:30:16+5:302023-01-28T13:31:07+5:30
वार्षिक निरंकारी संत समागम : शोभायात्रेत विविध राज्यांतील लोकसंस्कृतीचा संगम
औरंगाबाद : कोणी वाहतूक व्यवस्थेच्या कामात होते... कोणी लंगरमध्ये सेवा देत होते... कोणी स्वच्छतागृहात स्वच्छतेचे काम करीत होते. काम दिले, तिथेच स्वयंसेवक थांबून सेवा देत होते. कोणी कोणाची जात-धर्म विचारत नव्हते. ‘मानवता हाच धर्म’ हाच संदेश सर्वांच्या हृदयात कोरला होता.
‘बोलो प्यार से धन निरंकार’ असा जयघोष करीत हजारो भाविक येत होते. कोणी वाट चुकले, तर त्यांना सेवेकरी ‘महात्मा’ म्हणून हात जोडून पुढील मार्ग दाखवत होते... तन मन धनाने सेवादलाचे १५ हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक नि:स्वार्थपणे काम करीत होते. वार्षिक संत समागमच्या पहिल्या दिवशी लाखभर भाविकांनी हजेरी लावून श्रद्धा, सेवा, शिस्त, समर्पण, आणि मानवतेचे विराट दर्शन घडविले.
बिडकीन डीएमआयसीमध्ये ३०० एकरांवर ५६ व्या वार्षिक संत समागमाला शुक्रवारी लाखो भाविकांच्या साक्षीने सुरुवात झाली. ३ लाख चौरस फुटांच्या भव्य सभामंडपाच्या पूर्व बाजूने दुपारी १२ वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली. सजविलेल्या पांढऱ्या शुभ्र वाहनाला रथाचे स्वरूप देण्यात आले होते. वाहनाला जरबेरा फुलांच्या गुच्छांनी सजविले होते. सद्गुरू माता सुदीक्षाजी आणि निरंकारी राजपिता रमित महाराज विराजमान झाले होते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोकांची झुंबड उडाली होती. एवढी गर्दी असतानाही कुठेही गोंधळ नव्हता. भाविकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन याद्वारे घडविले. शोभायात्रेत लेझीम पथकापासून, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य, कोळीनृत्य, ढोल नृत्य, विठ्ठल, विठ्ठल नामात पाऊली खेळण्यात रमलेले वारकरी, भांगडा ते गरबापर्यंत देशभरातील विविध राज्यांच्या लोकसंस्कृतीचा संगम शोभायात्रेत बघण्यास मिळाला. मुख्य प्रवेशद्वारावर सद्गुरूचे रथातून आगमन झाले, तेव्हा पृष्पवृष्टी करण्यात आली. मुख्य मंडपात जमलेल्या हजारो भाविकांनी ‘धन निरंकर’ असा जयघोष केला. त्यानंतर, भक्तिगीत, आध्यात्मिक प्रवचनात सर्वजण रमून गेले होते.
धरतीला स्वर्ग बनवा
सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगितले की, माणसाला माणसासारखी वागणूक द्या, कोणी उच्च नाही, कोणी निच्च नाही, सर्व समान आहेत. पहिले परमात्मा कोण आहे, हे जाणून घ्या, परमात्मा प्रत्येकात आहे. सर्व अहंकार सोडून मानव सेवेत स्वताला अर्पण करा. परमात्मा जाणल्यावर आत्मीयता निर्माण होते व नंतर माणुसकीचा भाव निर्माण होतो. एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होते. याच प्रेमातून आपण धरतीला स्वर्ग बनवू या.