लाखो मराठा बांधव सभेसाठी अंतरवालीकडे; सोलापूर-धुळे महामार्ग जाम, हे पर्यायी मार्ग वापरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 11:27 AM2023-10-14T11:27:04+5:302023-10-14T11:27:54+5:30

एक मराठा लाख मराठा,लाखों मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे, धुळे- सोलापूर महामार्ग जाम

Lakhs of Maratha brothers towards Antarwali Sarati for Manoj Jarange's sabha; Solapur-Dhule highway jam, use this alternate route | लाखो मराठा बांधव सभेसाठी अंतरवालीकडे; सोलापूर-धुळे महामार्ग जाम, हे पर्यायी मार्ग वापरा

लाखो मराठा बांधव सभेसाठी अंतरवालीकडे; सोलापूर-धुळे महामार्ग जाम, हे पर्यायी मार्ग वापरा

छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटी (रामगव्हाण रस्ता) येथील आजच्या मराठा आरक्षणाच्या संबोधन सभेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सोलापूर-धुळे महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. सभेला राज्यभरातून लाखो समाजबांधव उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने पोलिस अधीक्षक मनिष कलवानीया यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच धुळे-सोलापूर महामार्ग सभेकडे जाणाऱ्या वाहनांनी जाम झाला आहे.  वाहनधारक बीड आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ते वापरत आहेत.  

सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात होईल. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई भागातून जवळपास लाखो समाजबांधव या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सभेचे ठिकाण धुळे-साेलापूर महामार्ग (क्रमांक ५२) लगत असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या महामार्गावरील इतर जड वाहनांची वाहतूक शुक्रवारी रात्री १० ते शनिवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बंद राहील. या दरम्यान जड वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

भालगाव फाट्यापासूनच ट्राफिक जाम
धुळे- सोलापूर महामार्गावर सर्व गाड्या मनोज जरांगे पाटलांच्या सभेला जाणाऱ्या आहेत. जागोजागी चहा, नाष्टाची सोय करण्यात आली आहे. पाचोड येथील टोल सभेसाठी येणाऱ्या गाडयासाठी बंद करण्यात आला आहे.तसेच पाचोड टोलनाक्यापासूनच सोलापूर-धुळे महामार्गावर केवळ सभेसाठी जाणाऱ्यांची दिसून येत आहे. वडीगोदरीपासून अलीकडेच सहा किलोमीटर सर्व गाड्या थांबवल्या आहेत. सभेचे मैदान आणि पार्किंगसह सगळे हाऊसफुल झाले आहे.

असा असेल पर्यायी मार्ग
छत्रपती संभाजीनगर -बीडकडे जाणारी वाहतूक
-छत्रपती संभाजीनगर, बिडकीन, पैठण, मुुंगी, बोधेगाव, पारगाव, पाडळ सिंगीमार्गे, बीडकडे जाईल.
-छत्रपती संभाजीनगर-कचनेर कमान, बिडकीन, पैठण, मुंगी, बोधेगाव, पारगाव, पाडळसिंगीमार्गे बीडकडे जातील.

बीड पाचोडमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहतूक
-बीड, पाडळसिंगी फाटा, पारगाव, बोधेगाव, पैठण, बिडकीनमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येईल.

छत्रपती संभाजीनगर ते बीडकडे जालनामार्गे जाणारी वाहतूक
-छत्रपती संभाजीनगर, बदनापूर, जालना, घनसावंगीमार्गे बीडकडे जाईल.

Web Title: Lakhs of Maratha brothers towards Antarwali Sarati for Manoj Jarange's sabha; Solapur-Dhule highway jam, use this alternate route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.