सीईटी सेलच्या अजागळ कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांना मनस्ताप
By राम शिनगारे | Published: June 20, 2023 09:06 PM2023-06-20T21:06:06+5:302023-06-20T21:06:17+5:30
समन्वयाचा अभाव : तारीख जाहीर होऊनही ऑनलाईन नोंदणी सुरू होईना
छत्रपती संभाजीनगर : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) १५ जूनपासून अभियांत्रिकीसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, पाच दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही सुरुवात झालेली नाही. सीईटी सेलच्या संकेतस्थळावर संपर्क साधण्यासाठी देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची यादीही हटविण्यात आली असून, एमएचटी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत.
सीईटी सेलच्या कारभाराविषयी प्रवेश नियामक मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मुख्य सचिव जे.पी. डांगे यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी तंत्रशिक्षण विभागाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे उशीर होत असल्याचा दावा केला. त्यावर तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद माेहितकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, सीईटी सेलकडून देण्यात येत असलेली माहिती चुकीची आहे. ऑनलाईन नोंदणीला सुरुवात करण्यास कोणत्याही प्रकारच्या सीट मॅट्रिक्सची गरज नाही.
सीईटी सेलकडून अभियांत्रिकीसह ९ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी १५ जूनपासून करण्याची घोषणा केली होती. त्यास पाच दिवस उलटले तरी कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेले प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांना विचारणा केली. त्यांनी सांगितले की, ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक असलेली जागांची उपलब्धता तंत्रशिक्षण विभागाकडून प्राप्त झालेली नाही. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यास उशीर होत आहे. त्याशिवाय इतरही काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या दोन दिवसांत दूर केल्या जातील. सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभूषण यांच्यासह तंत्रशिक्षणचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांना समन्वय साधून मार्ग काढण्याच्या सूचना दिल्याचेही डांगे यांनी सांगितले. त्याशिवाय सीईटी सेल एकूण १८ परीक्षा घेतो. या सर्व परीक्षांची संख्या कमी करून एकच सीईटी घेण्याविषयी चर्चा सुरू आहे.
तंत्रशिक्षण विभागाचे पूर्ण सहकार्य
तंत्रशिक्षण विभागाचे सीईटी सेलला पूर्ण सहकार्य आहे. अभियांत्रिकीच्या सीट मॅट्रिक्सची लिस्ट एआयसीटीईकडून अद्याप प्राप्त झालेली नाही. ३० जूनपर्यंत ती प्राप्त होईल. तोपर्यंत सीईटी सेल ऑनलाईन नोंदणी करू शकतो. त्यांच्या प्रवेशाच्या फेरीपूर्वीच सीट मॅट्रिक्स एआयसीटीईकडून प्राप्त होईल. त्यामुळे सीईटी सेलकडून तंत्रशिक्षण विभागावर घेतलेल्या आक्षेपाला कोणताही आधार नसल्याची माहिती संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.