हिमायतनगरात ४ लाखांचा ऐवज लंपास
By Admin | Published: February 17, 2016 11:40 PM2016-02-17T23:40:36+5:302016-02-17T23:46:51+5:30
हिमायतनगर : शहरातील परमेश्वर गल्लीत मंगळवारी रात्री चोरी होवून सुमारे ४ लाख १० हजारांचा ऐवज लांबविण्यात आला.
हिमायतनगर : शहरातील परमेश्वर गल्लीत मंगळवारी रात्री चोरी होवून सुमारे ४ लाख १० हजारांचा ऐवज लांबविण्यात आला.
चोरट्यांनी सर्वप्रथम अॅड़ दिलीप रेड्डी राठोड यांच्या घरी लोखंडी गेट व दरवाजाचे कुलूप तोडून रोख रक्कम व दागिने मिळून ३ लाख ८२ हजार ५०० रुपये लंपास केले. तर बजरंग चौकातील नंदकुमार लक्ष्मण मुधोळकर (बजरंग चौक) यांच्या घरातील रोख रक्कम व दागिने मिळून २७ हजारांचा ऐवज लंपास केला, अशी माहिती सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी़ एस़ डांगरे, पोहेकॉ मंजू जाधव यांनी दिली़
परमेश्वर गल्लीतील अॅड़दिलीप राठोड हे सहकुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी चोरी केली़ यापूर्वी शहरात तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या़ चोरटे तोंडाला रुमाल बांधून पळून जातानाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपलेले असताना चोर अद्याप सापडले नाहीत़ या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपविभागीय अधिकारी आवटे यांनी घटनास्थळी भेट दिली़
चिखली येथे
७० हजारांची चोरी
इस्लापूर : मौजे चिखली (ई) येथे चोरीत ७० हजार रुपयांचा माल चोरीला गेल्याची फिर्याद दिल्याने इस्लापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ फिर्यादीत मजूर महिलेचे नाव आरोपी म्हणून टाकण्यात आले़ चौकशीअंती सत्य उजेडात येईल, असा आशावाद सपोनि संजीवन मिरकले यांनी व्यक्त केला. फिर्यादी परमेश्वर उसन्ना झरेवाड (वय ४२, रा़चिखली) यांनी अशी फिर्याद दिली, आरोपी गंगाबाई पंढरी निलावार हिने १३ फेब्रुवारी रोजी दुपारी घरातील कपाटातील सहा तोळ्याची चैन (किंमत ५० हजार), दोन तोळ्यांचे नेकलेस (२० हजार रुपये) असे एकूण ७० हजार रुपयांची चोरी झाली, अशी फिर्याद दिल्याने ठाण्यात गुन्हा दाखल झाला, अशी माहिती जमादार गायकवाड यांनी दिली़
व्यापाऱ्यांकडूनच
रात्रीची गस्त
निवघा बाजार : येथे २० दिवसांत मोठ्या साखळी चोऱ्या झाल्या़ चोरट्यांनी दोनवेळा आठ दुकाने फोडून ऐवज लंपास केला़ व्यापाऱ्यांनाच टार्गेट केल्याने व्यापारी धास्तावले आहेत़ चोरटे रोजच गावात येत असल्याची चर्चा असल्याने व्यापाऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे़ यामुळे व्यापाऱ्यांनी गस्त घालण्यास सुरुवात केली़ व्यापारी संघाचे अध्यक्ष भगवानराव शिंदे यांनी सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेवून प्रत्येक दिवशी पाच-पाच जण मिळून गस्त घालण्याचे ठरविण्यात आल्याने आता व्यापारी दररोज रात्रीला गस्त घालत आहेत़ यातच हदगाव पोलिसांची पेट्रोलिंग सुरू आहे़ यामुळे सध्यातरी चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत़ २० दिवसांत दोन वेळा चोरी झाली़ (वार्ताहर)
शिक्षक दाम्पत्याचे घर भरदिवसा फोडले
बिलोली : येथील गांधीनगर भागातील महावितरण कंपनीच्या शेजारी असलेल्या शिक्षक दाम्पत्याच्या घरी भरदिवसा चोरी झाली. दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील बारा तोळ्याचे दागिने लंपास झाले. गांधीनगर येथील प्रा. हणमंत मटके यांच्या घरात शिक्षक नागेश मठपती भाड्याने राहतात. दोघे पती-पत्नी शिक्षक असल्याने दररोजप्रमाणे सकाळी शाळेच्या वेळेला घराला कुलूप लावून बाहेर पडले. शेजारीच महावितरण कार्यालय तर दुसऱ्या बाजूला पूज्य साने गुरुजी विद्यालयाची शाळा आहे. घरमालक प्रा. मटके देखील महाविद्यालयासाठी जाण्याकरिता बाहेर निघाले. तेव्हा मठपती यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. दोघेही शिक्षक पती-पत्नी घरी नाहीत मग दार का उघडे म्हणून आत बघितले तर कपाट आडवे पडलेले व फोडलेले दिसले. यावरुन चोरी झाल्याची घटना समोर आली. चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने ज्यात गंठण, कानातले फूल, लॉकेट, अंगठी असे जवळपास १२ तोळे दागिने गायब केले. याबाबत बिलोली पोलिसांत तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. भरदिवसा घर फोडल्याने संपूर्ण गांधीनगर व बिलोलीत भीतीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)