‘लाल परी’ला मिळाल्या ५ महिला चालक; पण ‘स्टिअरिंग’पासून दूर, तिकीट फाडताय
By संतोष हिरेमठ | Published: June 10, 2023 07:32 PM2023-06-10T19:32:13+5:302023-06-10T19:32:37+5:30
४ वर्षांच्या खडतर प्रवासानंतर बसस्थानकांत अखेर नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर :एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात म्हणजे जिल्ह्यात तब्बल ४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ५ महिला चालक मिळाल्या. चालक तथा वाहक असे त्यांचे पद आहे. राज्यात काही ठिकाणी महिला चालक म्हणून कर्तव्य बजावणे सुरूही झाले. मात्र, विभागात सध्या वाहकांचा तुटवडा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिला चालक अजूनही ‘स्टिअरिंग’पासून दूरच असून, वाहक म्हणूनच त्या जबाबदारी पार पाडत आहेत.
एसटी महामंडळात २०१९ मध्ये ‘ चालक कम वाहकपदी’ महिलांची नियुक्ती करण्यात आली. कोरोना प्रादुर्भाव, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशिक्षणावर परिणाम झाला. अखेर जवळपास ४ वर्षांच्या कालावधीनंतर प्रशिक्षणाचा कालावधी संपला आणि प्रशिक्षणाचे सर्व टप्पे पार करणाऱ्या महिलांना १ जून रोजी विविध आगारांमध्ये पोस्टिंग देण्यात आली. यात शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात ३ आणि गंगापूर, वैजापूर आगारात प्रत्येकी एका महिला चालक कम वाहकाची नियुक्ती करण्यात आली. परंतु, आजघडीला जिल्ह्यात जवळपास ९८ वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे या महिला वाहकांना अजूनही चालक म्हणून कोणत्याही कर्तव्यावर पाठविण्यात आलेले नाही.
विभाग नियंत्रक म्हणाले...
विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले, चालक तथा वाहक हे पद ज्यावेळी जी आवश्यकता भासेल, त्यानुसार आगारस्तरावर त्यांचा उपयोग करण्यात येतो. आगामी काळात चालक कमतरता झाल्यास आगारस्तरावर तसा वापर करता येईल.
जिल्ह्यातील महिला एसटी चालक
मध्यवर्ती बसस्थानकात शोभा प्रभाकर मोरे, रमा गायकवाड आणि जयश्री आर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर वैजापूर आगारात वणिता मोरे आणि गंगापूर आगारात विजू वावळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.