‘लालपरी’ धावली; हाल थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:52 AM2017-10-22T00:52:42+5:302017-10-22T00:52:42+5:30
सकाळपासूनच ‘लालपरी’ रस्त्यावर धावली. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टया संपवून परतीच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचे होणारे हाल थांबले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. चार दिवस हा संप चालल्यानंतर शनिवारी तो मागे घेण्यात आला. सकाळपासूनच ‘लालपरी’ रस्त्यावर धावली. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टया संपवून परतीच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचे होणारे हाल थांबले आहेत. चार दिवस शुकशुकाट असलेल्या स्थानकांमध्ये शनिवारी सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी दिसून आली.
सातवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्यांसह इतर २४ मागण्यांना घेऊन ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. यामुळे जिल्ह्यातील ८ आगार आणि १८ स्थानकातून एकही बस बाहेर पडली नव्हती.
दिवाळीच्या सणासाठी गावाकडे येणा-यांना मात्र याचा मोठा त्रास सहन करावा लागला. दिवाळीमध्ये आगोदरच प्रवाशांची मोठी गर्दी असते, त्यात हा संप. यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. यामध्ये खाजगी वाहनचालकांनी प्रवाशांकडून दुप्पट, तिप्पट तिकीट वसूल करून त्यांची आर्थिक लूट केली. त्यांच्यासाठी ही ‘दिवाळी’ गोड झाली. प्रवाशांना मात्र जादा पैसे मोजावे लागल्याने त्यांचा एकप्रकारे ‘शिमगा’च झाला.
दरम्यान, येताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. परंतु आता हा संप मिटल्याने परतीच्या दिशेने जाण्यासाठी होणारा त्रास टळला आहे. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.