‘देशबंधू’चे मुख्य संपादक ललित सुरजन यांचे निधन
By | Published: December 4, 2020 04:04 AM2020-12-04T04:04:28+5:302020-12-04T04:04:28+5:30
रायपूर : ज्येष्ठ पत्रकार आणि हिंदी दैनिक ‘देशबंधू’चे मुख्य संपादक ललित सुरजन (७४) यांचे बुधवारी सायंकाळी नवी दिल्लीतील ...
रायपूर : ज्येष्ठ पत्रकार आणि हिंदी दैनिक ‘देशबंधू’चे मुख्य संपादक ललित सुरजन (७४) यांचे बुधवारी सायंकाळी नवी दिल्लीतील इस्पितळात निधन झाले.
त्यांच्या कुटुंबातील सदस्याने सांगितले की, फुफ्फुसाच्या कर्करोगावरील उपचारासाठी ते गेल्या काही दिवसापासून दिल्लीत होते. सोमवारी त्यांना मस्तिष्कघात झाल्याने बुधवारी सायंकाळी धर्मशीला नारायणा इस्पितळात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन कन्या, असा परिवार आहे.
छत्तीसगडचे राज्यपाल अनुसुईया उईके, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ललित सुरजन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून आदरांजली वाहिली.
देशबंधू वृत्तपत्राचे मुख्य संपादक ललित सुरजन यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. पत्रकारितेतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे राज्यपालांनी ट्विट केले आहे.
ललित सुरजन हे पुरोगामी विचारवंत, लेखक, कवी आणि ज्येष्ठ पत्रकार होते. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला धक्का बसला. त्यांचे पिता स्व. मायाराम सुरजन यांनी सांप्रदायिकतेविरुद्ध पेटवलेली ज्योत ललितभय्या यांनी तेवत ठेवली. आयुष्यात त्यांनी कधीही मूल्यांशी तडजोड केली नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
पत्रकारितेची मोठी हानी -विजय दर्डा
हिंदी दैनिक ‘देशबंधू’चे एडिटर इन चीफ ललित सुरजन यांच्या निधनाने पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. त्यांनी सदैव पत्रकारितेच्या उच्च मूल्यांचे पालन केले. सजग पत्रकार म्हणून आपला वेगळा ठसा उमटविला. त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली.
विजय दर्डा, माजी खासदार आणि चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड