लालपरीची सुरक्षा यंत्रणाच कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:06 AM2021-02-23T04:06:12+5:302021-02-23T04:06:12+5:30

कन्नड : सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या लालपरीची सुरक्षा यंत्रणाच कुचकामी असल्याचा धक्कादायक प्रकार कन्नड आगारात उघडकीस आला आहे. त्यामुळे ...

Lalpari's security system is ineffective | लालपरीची सुरक्षा यंत्रणाच कुचकामी

लालपरीची सुरक्षा यंत्रणाच कुचकामी

googlenewsNext

कन्नड : सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या लालपरीची सुरक्षा यंत्रणाच कुचकामी असल्याचा धक्कादायक प्रकार कन्नड आगारात उघडकीस आला आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

‘एसटीचा प्रवास सुखकर प्रवास’ असे म्हटले जाते. परंतु हा प्रवास खरच किती सुरक्षित असेल याबाबत ‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केले. तेव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बसला आग लागल्यास ती विझविण्यासाठी बसमध्ये चार किलो आणि सहा किलो वजनाचे असे दोन सिलिंडर ठेवलेले असतात. कन्नड आगारात ५० बस आहेत. चार किलो वजनाचे ४६ व ६ किलो वजनाचे ४६ सिलिंडर आहेत. त्यामुळे चार आणि सहा किलो वजनाचे प्रत्येकी चार सिलिंडर कमी आहेत.

रिफिलिंग करण्यासाठी २० सिलिंडर पाठविण्यात आले असून, ते कित्येक महिन्यांपासून आगाराला मिळालेलेच नाहीत. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जवळजवळ सर्वच सिलिंडरची मुदत संपलेली आहे. त्यामुळे हे फक्त दिखाव्यासाठीच बसमध्ये ठेवले जात असून, दुर्घटना घडल्यास प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आगारातील ५० पैकी ३५ बसमध्येच जॅक असल्याचे समोर आले, तर १५ बस विनाजॅकच्याच बाहेरगावी पाठविल्या जातात. लांब पल्ल्याच्या बस पंक्चर झाल्यास चालक-वाहकांना व प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. बस जवळच्या आगारात दुरुस्तीला गेल्याशिवाय चाक बदलणे शक्य होत नाही. किंवा दुसरी बस त्या मार्गावर बोलावून त्यातून टॅमी घेऊन चाक बदलले जाते. यामध्ये प्रवाशांचा वेळ जातो. एका दृष्टीने प्रवाशांचा प्रवास सुखकर होत नाही. त्यामुळे एसटीच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासतो.

प्रथमोपचार पेट्याही गायब

प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी आवश्यक आहे. प्रवासामध्ये छोटा-मोठा अपघात होऊन प्रवाशांना इजा झाल्यास प्राथमिक उपचार देण्यासाठी प्रथमोपचार पेटी अत्यंत आवश्यक असते. सुरुवातीला ही पेटी चालकाच्या कॅबिनमध्ये बसवलेली असायची. आता मात्र ही पेटी गायब झालेली आहे. ही पेटी आता वाहकांकडे दिलेली असते, असे सांगण्यात आले. तेव्हा काही वाहकांकडे याबाबत चौकशी केली. परंतु त्यांनी आमच्याकडे प्रथमोपचार पेटी देण्यात आलेलीच नाही, असे स्पष्टीकरण दिले तर एक दोन वाहकांकडे आढळून आलेल्या पेटीतील औषधी मुदतबाह्य झाल्याचे दिसून आले आहे.

वाय-फाय सुविधाचा गाशा गुंडाळला

प्रवाशांना करमणुकीसाठी मोबाइलवर चित्रपट पाहता यावा, त्याचबरोबर इंटरनेटवर सर्व महत्त्वाची कामे करता यावी यासाठी एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करीत बसमध्ये वाय-फाय सुविधा सुरू झाली. मात्र, ही सुविधा आता फक्त नावापुरतीच उरली आहे. बहुतांश बसमध्ये वायफायचे नुसतेच बॉक्स दिसून आले.

सीसीटीव्ही बसविले, जबाबदारी संपली

कन्नड आगारात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे येथील प्रवेशद्वारावर असलेले सुरक्षारक्षक बिनधास्त झाले. आगारात कोणीही कोणत्याही ठिकाणी जाऊन येते. कोणाचीही साधी चौकशीदेखील होत नाही, असे एकंदरीत चित्र दिसून आले.

कन्नड आगाराला नवीन सिलिंडर मिळालेले नाही. जे सिलिंडर रिफिलींगसाठी पाठविलेले आहेत, ते अद्याप प्राप्त झालेले नाही. तीन वर्षांपूर्वी ५८ व दोन वर्षांपूर्वी २० प्रथमोपचार पेट्या आगाराला मिळालेल्या आहेत. प्रत्येक बसमध्ये वाहकांकडे प्रथमोपचार पेटी वितरित करण्यात आल्या आहेत. आगाराकडे ३५ जॅक असल्याने लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्येच जॅक दिलेला असतो. मात्र, जवळच्या फेऱ्या करणाऱ्या गाड्यांमध्ये जॅक दिला जात नाही. - कमलेश भारती, आगारप्रमुख

(फोटो : बसमधील मुदतबाह्य अग्निशमन सिलिंडर)

Web Title: Lalpari's security system is ineffective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.