बस प्रवासात सहा तोळ्यांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:04 AM2021-03-16T04:04:16+5:302021-03-16T04:04:16+5:30
औरंगाबाद : घरात दागिने ठेवले, तर घर फोडून चोरटे ते चोरून नेतील, या भीतीने विवाहितेने माहेरी जाताना दागिने सोबत ...
औरंगाबाद : घरात दागिने ठेवले, तर घर फोडून चोरटे ते चोरून नेतील, या भीतीने विवाहितेने माहेरी जाताना दागिने सोबत नेले; परंतु म्हणतात ना की, नशीब कुठेही आडवे येते. ती विवाहिता रविवारी माहेरुन औरंगाबादेत परत येत असताना चोरट्याने संधी साधली आणि बस प्रवासात त्या विवाहितेचे पर्समधील सहा तोळ्यांचे दागिने चोरट्याने लंपास केले.
दीपिका रवींद्र मोरे ही विवाहिता पती व सात वर्षांच्या मुलासह उत्तरानगरीत राहते. ७ मार्चला त्यांना मुलासह भोकरदन तालुक्यातील माहेरी जायचे होते. पती खासगी कंपनीत कामास असतात. माहेरी गेल्यानंतर ते कामाला गेल्यावर घर बंदच राहील. अलीकडे घरफोडीच्या घटना फार वाढल्या आहेत. या भीतीपोटी विवाहितेने सर्व दागिने स्वत:च्या पर्समध्ये ठेवले व मुलाला सोबत घेऊन त्या माहेरी गेल्या.
रविवारी त्या माहेरून भोकरदनहुन बुलढाणा-वैजापूर या बसमध्ये बसून औरंगाबादकडे येण्यासाठी निघाल्या. प्रवास करताना सोबत नेलेले सर्व सोन्या व चांदीचे दागिने त्यांनी मोठ्या पर्समधून एका लहान-लहान पाकिटामध्ये ठेवले. साधारणत: तीन वाजण्याच्या सुमारास त्या हर्सूल थांब्यावर उतरल्या. खाली उतरल्यावर त्यांनी पर्स तपासली तेव्हा त्यात दागिने नसल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. बराचवेळ पर्स तपासल्यानंतर एकही दागिना दिसत नव्हता. प्रवासादरम्यान दागिने चोरी गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी थेट सिटी चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अनंत तांगडे करत आहेत.
चौकट.................
पर्समध्ये ठेवले होते दागिने
माहेरी जाताना दीपिका रवींद्र मोरे यांनी आपल्या पर्समध्ये सोन्याची अडीच ग्रॅमची तारवाटी, दोन ग्रॅमचे डोरले, पाच ग्रॅमची अंगठी, २५ ग्रॅमची पोत, साडेबारा ग्रॅमची लहान पोत, तीन व पाच ग्रॅमचे कानातले रिंग, अर्ध्या ग्रॅमची नथ, चार ग्रॅमच्या दोन अंगठ्या, एक ग्रॅमची कानातली बाळी, साडेचार ग्रॅमचे कानातील वेल आणि अडीच ग्रॅमचे लॉकेट व चांदीची ३० ग्रॅमची सोनसाखळी ठेवली होती. चोरट्यांनी सर्व दागिन्यांवर डल्ला मारला.