अंत्यविधीसाठीही लागेनात दिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:09 AM2017-12-30T00:09:58+5:302017-12-30T00:10:01+5:30
सातारा- देवळाई भागात राहणा-या नागरिकांचा आनंद दोन वर्षांपूर्वी गगनात मावत नव्हता. निमित्त होते, शासनाने या भागाचा मनपा हद्दीत समावेश केल्याचा; पण मागील दीड - दोन वर्षांपासून या भागातील नागरिकांना दररोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. याचा प्रत्यय गुरुवारी येथे आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सातारा- देवळाई भागात राहणा-या नागरिकांचा आनंद दोन वर्षांपूर्वी गगनात मावत नव्हता. निमित्त होते, शासनाने या भागाचा मनपा हद्दीत समावेश केल्याचा; पण मागील दीड - दोन वर्षांपासून या भागातील नागरिकांना दररोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. याचा प्रत्यय गुरुवारी येथे आला.
सातारा येथील रहिवासी अश्विनी देशमुख यांचे गुरुवारी निधन झाले. नातेवाईकांनी रात्री उशिरा अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. रात्री ९.३० वाजता अंत्यसंस्कार करायचे तर कसे, असा प्रश्न नातेवाईक आणि गावकºयांना पडला. सातारा-देवळाई भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मृतदेह न्यायचा कसा, स्मशानभूमीतील अंधारात अंत्यसंस्कार कसे करणार, असे एक नव्हे असंख्य प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. संकटात धावून येण्याची प्रवृत्ती असलेल्या गावकºयांनी तब्बल ४०० फूट वायर टाकून स्मशानभूमीपर्यंत लाईट, फोकस लावण्याची व्यवस्था केली. त्यामुळे अंत्यविधी व्यवस्थित पार पडला. मागील महिन्यात एका लहान मुलीचा सातारा कब्रस्तानात दफनविधी करतानाही अनेक अडचणींना सामना करावा लागला. या भागात राहणाºया नागरिकांना रात्री अंत्यविधी करायचा म्हटले, की अक्षरश: धडकीच भरते. कारण स्मशानभूमीत कोणत्याच मूलभूत सोयी-सुविधा नाहीत. यासंदर्भात नगरसेविका सायली जमादार यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून पथदिवे लावा, स्मशानभूमीत मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या यासाठी प्रशासनाकडे पन्नास वेळेस पत्रव्यवहार केला. पथदिव्यांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू असल्याचे उत्तर अधिकाºयांकडून देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापालिकेतील अधिकाºयांनी ठरविले, तर त्यांच्या सोयीची कामे अवघ्या काही मिनिटांमध्ये होतात. त्यासाठी टेंडर, आयुक्तांची मंजुरी, स्थायी-सर्वसाधारण सभेची मंजुरीही लागत नाही. ‘६७-३-सी’ या आणीबाणीच्या कायद्याचा आधार घेत पाणीपुरवठा विभागाने ७ कोटींची कामे केली. लाखो रुपये खर्च करून पदाधिकाºयांची दालने चकाचक होतात. ज्यांना अधिकार नाहीत, त्या अधिकाºयांना क्षणार्धात विमान प्रवासाची मुभा आणि खर्चापोटी अॅडव्हान्स मिळतो. स्मशानभूमीत चार दिवे लावण्यासाठी प्रशासनाला निविदा प्रक्रिया करावी लागते; यापेक्षा सर्वसामान्यांचे दुर्दैव आणखी काय असावे!
२०० लाईट फिटिंग तयार
मनपाने सिडको बसस्थानक ते जळगाव रोडवर नवीन २०० लाईट बसविले. जुने २०० लाईट पडून आहेत. हे लाईट सातारा-देवळाईत लावा, असे आदेश महापौरांनी दिले होते. पंधरा दिवस उलटले तरी अधिकाºयांनी एकही पथदिवा साताºयात लावला नाही. फक्त पोल उभे करून लाईट लावणे एवढेही काम मनपाकडून होत नाही.