शहागंज ते सिटी चौक रस्त्यांसाठी भूसंपादन; विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांकडून मार्किंगही सुरू
By मुजीब देवणीकर | Published: November 2, 2023 01:48 PM2023-11-02T13:48:17+5:302023-11-02T13:51:23+5:30
सराफा रोड विकास आराखड्यानुसार १५ मीटर रुंद आहे. रुंदीकरणासाठी २०१८ मध्ये प्रक्रिया राबविण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहर विकास आराखड्यानुसार महापालिकेने शहरातील काही रस्त्यांचे भूसंपादन केले. मोजक्याच मालमत्तांचे भूसंपादन प्रलंबित होते. त्याकडे प्रशासनाने लक्षच दिले नाही. शहागंज ते सिटी चौक येथील मालमत्तांचे भूसंपादन करण्याचे आदेश प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले. सराफा येथे तर विशेष भूसंपादन कार्यालयाने मालमत्तांची मोजणी करून मार्किंगची प्रक्रियाही पूर्ण केली.
शहागंज ते सिटी चौक या १५ मीटर रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या मालमत्तेचे भूसंपादन केले जात आहे. भूसंपादनासाठी महापालिकेकडे ३० लाख रुपये भरण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती विशेष भूसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे यांनी दिली. सराफा रोड विकास आराखड्यानुसार १५ मीटर रुंद आहे. रुंदीकरणासाठी २०१८ मध्ये प्रक्रिया राबविण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार तत्कालीन आयुक्तांनी २०२० मध्ये भूसंपादन प्रक्रिया राबविण्यासाठी मान्यता दिली; मात्र भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली नाही. विशेष भूसंपादन कार्यालयाने विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये सराफा रोडवरील पुरवार कुटुंबाच्या नगर भूमापन क्रमांक ६२०७ या मिळकतीचे ५०.८८ क्षेत्र बाधित होत आहे. या मालमत्तेचे भूसंपादन करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली. या मालमत्तेची मोजणी करून मार्किंगही करण्यात आली. भूसंपादनासाठी महापालिकेकडे ३० लाख रुपये जमा करावेत, असा प्रस्ताव विशेष भूसंपादन कार्यालयाने पाठवला आहे. मनपाकडून ३० लाख रुपयांचा निधी जमा होताच भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे विशेष भूसंपादन अधिकारी दहे यांनी सांगितले.
चंपा चौक ते जालना रोडची चर्चा
चंपा चौक ते जालना रोड हा १०० फुटांचा रस्ता असून, जुन्या शहरासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर जवळपास ५०० पेक्षा अधिक मालमत्ता आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रशासक जी. श्रीकांत यांनी या भागात पाहणी केली. हा रस्ता खूपच आवश्यक असून, त्यासाठी काय करता येईल, याचा विचार करावा अशी सूचना प्रशासकांनी अधिकाऱ्यांना दिली. २०११-१२ मध्ये तत्कालीन आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनीही रस्त्याचा मुद्दा अजेंड्यावर घेतला होता. अनेक मालमत्ता पाहून त्यांनीही माघार घेतली होती.