शेंद्रा, वाळूज ‘इंडस्ट्रियल रोड’च्या भूसंपादनाचा गुंता आणखी वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 08:10 PM2020-08-06T20:10:24+5:302020-08-06T20:11:45+5:30
भूसंपादनासाठी रक्कम नसल्यामुळे डीएमआयसी आणि राज्य सरकारकडे जबाबदारी सोपविली आहे; पण राज्य शासनाकडे सध्या पैसा नसल्यामुळे त्या रोडचे काम अधांतरी आहे.
- विकास राऊत
औरंगाबाद : केंद्रीय दळणवळण खात्याने २०१५ मध्ये जाहीर केलेल्या बीड बायपास आणि जालना रोड हे दोन्ही प्रकल्प नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने रद्द केल्यानंतर शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज या इंडस्ट्रियल रोडच्या भूसंपादनाचा गुंता निर्माण केला आहे. डीएमआयसी आणि राज्य शासनाने भूसंपादन करण्याच्या नवीन तरतुदींमुळे अजून तरी याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. मात्र, केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या यादीत एनएच-७५३ म्हणून त्या रोडची नोंद झाली आहे. या रोडबाबत आठ महिन्यांपासून काहीही निर्णय न झाल्याने सदरील रोडचा प्रस्ताव अधांतरी आहे.
भूसंपादनासाठी रक्कम नसल्यामुळे डीएमआयसी आणि राज्य सरकारकडे जबाबदारी सोपविली आहे; पण राज्य शासनाकडे सध्या पैसा नसल्यामुळे त्या रोडचे काम अधांतरी आहे.जालना रोडसाठी फक्त ७४ कोटी मंजूर झाले आहेत, तर बीड बायपासचे काम पीडब्ल्यूडीकडे वर्ग करून प्रकरण संपविण्यात आले आहे. डीएमआयसीअंतर्गत शेंद्रा ते बिडकीन इंडस्ट्रियल पार्क ते वाळूज औद्योगिक वसाहत या इंडस्ट्री ट्रँगलसाठी स्वतंत्र मार्ग बांधण्याचा ९०० कोटींचा प्रस्ताव नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे सुपूर्द करण्यात आला होता.
औरंगाबाद ते पैठणमार्गे शेवगाव या रस्त्यासह १९०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा त्यांचा अंदाज होता. त्याचा डीपीआर होण्यापूर्वीच दुसऱ्या टप्प्यात या कामांचे पाहू असे स्पष्ट केल्याने त्या रोडचे काम अधांतरी पडले आहे.
पैठण रोडबाबत काहीही निर्णय नाही
शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज हा आठ पदरी मार्ग करण्याचा प्रस्ताव आहे. त्यात औरंगाबाद ते पैठण या चौपदरी मार्गाचेदेखील समायोजन होते. औरंगाबाद ते पैठण हा रोड भारतमाला या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. त्या रस्त्याचे काम करावे लागेल, असे गडकरी यांनी १२ जानेवारी २०२० रोजी स्पष्ट केले होते; परंतु आठ महिन्यांत या रस्त्याबाबत काहीही नवीन निर्णय झालेला नाही.
दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले अलायमेंट
शेंद्रा, बिडकीन, वाळूज ते करोडीमार्गे हा रस्ता नॅशनल हायवेच्या यादीत आला आहे. औद्योगिक वाहतुकीसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. ७६३ ए आणि बी अशी रस्त्याची नोंद दळणवळण खात्याकडे झाली आहे. नॅशनल हायवेचे अलायमेंट दोन महिन्यांपूर्वी जाहीर झाले आहे. नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने त्यांच्या यादीत हा रस्ता डीएमआयसीसाठी मंजूर करून घेतला आहे. डीएमआयसीकडून भूसंपादनासाठी तरतूद करावी लागणार आहे. आता अलायमेंटमध्ये बदल होणार नाही, असे दळणवळण खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
काय म्हणाले होते गडकरी
जानेवारी २०२० मध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज या रोडचा दुसऱ्या टप्प्यात विचार करू, सध्या काहीही सांगू नका, असे एनएचएआय, पीडब्ल्यूडीच्या बैठकीत स्पष्ट केले होते, तसेच औरंगाबाद ते पैठण हा रोड भारतमाला या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. त्या रस्त्याचे काम करावे लागेल, असेही गडकरी म्हणाले होते, परंतु आठ महिन्यांपासून काहीही निर्णय झालेला नाही.