ड्रायपोर्टच्या लोहमार्गासाठी लवकरच होणार भूसंपादन
By Admin | Published: July 11, 2017 12:13 AM2017-07-11T00:13:48+5:302017-07-11T00:15:37+5:30
जालना : ड्रायपोर्ट ते दिनेगाव स्थानकापर्यंत अंथरण्यात येणाऱ्या लोहमार्गाचा आराखडा तयार करण्यात आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ड्रायपोर्ट ते दिनेगाव स्थानकापर्यंत अंथरण्यात येणाऱ्या लोहमार्गाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दिनेगाव स्थानकानजीक रेल्वेट्रॅक व अन्य विकास कामांसाठी जेएनपीटीला सुमारे १८० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. यासाठीची लवकरच भूसंपादन करण्यात येणार आहे.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. बैठकीस जेएनपीटीचे संचालक विवेक देशपांडे, अनुप अग्रवाल, जय कुमार, अर्जुन गेही, स्वप्नील चिंतलवार, रमेश येऊल, राजेश जोशी, पी. एन. प्रकाश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार डॉ.विपीन पाटील,
सुजीत गाढे आदींची उपस्थिती
होती.
ड्रायपोर्टच्या सुरक्षा भिंतीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. ड्रायपोर्ट ते जालना-औरंगाबाद महामार्गापर्यंत कंटेनर वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ता तयार करण्यात येणार आहे. यासाठी संपादित करावयाच्या जमिनीचे मोजमाप पूर्ण झाले आहे. सदर जमिनीचा शेतकऱ्यांना द्यावयाचा मोबदला निश्चित करून संपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी विनंती जेएनपीटीच्या सदस्यांनी जिल्हा प्रशासनास केली. त्याचबरोबर ड्रायपोर्ट ते दरेगावनजीक असलेल्या दिनेगाव स्थानकापर्यंत स्वतंत्र लोहमार्ग अंथरण्यात येणार आहे. या लोहमार्गाच्या आराखड्याचे काम रेल्वेने पूर्ण केले आहे. या लोहमार्गामुळे ड्रायपोर्टमधून थेट रेल्वे वाहतूक शक्य होणार आहे. वाहतुकीसाठी दिनेगाव स्थानकालगत मालधक्का तयार करण्यात येणार आहे. यासाठी अकरा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
तसेच मालवाहू रेल्वे उभ्या करण्यासाठी दुहेरी रेल्वेमार्ग अंथरण्याचे नियोजन आहे. या कामांसाठी दिनेगाव स्थानकालगतची १८१ हेक्टर जागा संपादित करण्याचे जेएनपीटीचे नियोजन आहे. संपादित करावयची जमीन, तिचे मोजमाप व दर निश्चित करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सूचना जिल्हा प्रशासनास देण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जसगाव शिवारात जाऊन ड्रायपोर्टच्या परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली.