भूसंपादन कामाला महिनाभरात सुरुवात
By Admin | Published: July 17, 2014 12:45 AM2014-07-17T00:45:17+5:302014-07-17T00:58:05+5:30
परळी: परळी शहरात नियोजित बायपाससाठी जमीन संपादनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून हे काम जलदगतीने करण्यात येणार असल्याने वाहतूक प्रश्न निकाली निघणार आहे.
परळी: परळी शहरात नियोजित बायपाससाठी जमीन संपादनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून हे काम जलदगतीने करण्यात येणार असल्याने वाहतूक प्रश्न निकाली निघणार आहे.
आ. धनंजय मुंडे यांनी परळीकरांच्या जिव्हाळ्याचा बायपासचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडला होता. बायपासच्या कामासाठी भूसंपादनाचे काम पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून परळी बायपासचा प्रश्न रेंगाळत पडला होता. त्याला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे टेंडर काढून बायपास लवकरात लवकर तयार करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, बायपासचे काम सुरू झाल्यानंतर त्याला गती मिळेल, यात शंका नाही. बायपास पूर्ण झाल्यानंतर बाहेर जिल्ह्यातून येणारी मोठी वाहने शहराच्या बाहेरुनच वळविली जाणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न परळीकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. १६ सप्टेंबर २०१३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत परळी बायपास रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. १९ सप्टेंबर २०१३ रोजी हे काम सुरू करण्यासंदर्भात बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार भूमापन कार्यालयाने बायपास होणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांचे आक्षेप मागविले होते. ज्या- ज्या शेतकऱ्यांचे आक्षेप प्रशासनाला प्राप्त झाले आहेत त्याचे निराकरण करण्यात आले आहे. भूमापन झाल्यानंतर आता भूसंपादनाचे काम ऐरणीवर येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया व प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे भूसंपादन कामास प्राधान्य दिल्यास हे काम एक महिन्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे, परंतु यावर पुन्हा कोणी आक्षेप घेतला तर हे काम रेंगाळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
शहरात वाहतूक वाढली
परळी शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढली आहे. वाहन खरेदी करणे सोपे झाले असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन खरेदी करणे सर्वसामान्यांना शक्य झाले आहे. परिणामी, वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. शहरातील काही भागातील रस्ते लहान आहेत. मोठे वाहन आले तर वाहतूक कोंडी होणे हा नित्याचा विषय ठरला आहे. मोंढा परिसरात असा एकही दिवस जात नाही की, वाहन कोंडी होत नाही. त्यामुळे बायपास तयार झाला तर शहरात होणारी वाहन कोंडी समस्या निकाली तर निघलेच शिवाय लहान-मोठे अपघात टळतील. (वार्ताहर)
परळी शहरात वाहनांची संख्या वाढली
मोठ्या व मालवाहू वाहनांमुळे शहरात वाहनकोंडी झाली नित्याची
बायपासचे काम लवकर झाल्यास नागरिकांना मिळणार दिलासा
बायपासमुळे बाहेरच्या जिल्ह्यातून येणारी वाहने बाहेरच वळणार
भूसंपादनाचे काम आक्षेप न घेतल्यास लवकर पूर्ण होण्याची शक्यता
बायपासच्या भूमापनाचे काम झाले पूर्ण