सालारजंग व खरेदी-विक्री संघात जमिनीचा वाद; मालमत्तेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:47 AM2018-06-20T00:47:53+5:302018-06-20T00:48:56+5:30
सालारजंग व खरेदी-विक्री संघात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या वादातून मंगळवारी खरेदी-विक्री संघाने पोलीस बंदोबस्तात जमिनीवर असलेल्या गोदामाला टाळे ठोकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सालारजंग व खरेदी-विक्री संघात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या वादातून मंगळवारी खरेदी-विक्री संघाने पोलीस बंदोबस्तात जमिनीवर असलेल्या गोदामाला टाळे ठोकले. दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मुळात पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याने सालारजंग मालमत्तेचा ताबा असलेल्या गटाने संताप व्यक्त करीत पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करीत जमिनीचा ताबा द्यावा, अशी मागणी केली आहे.
जिन्सी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या खरेदी-विक्री संघ आणि सालारजंग मालमत्तेवरून दोन गटांत सध्या वाद सुरू आहे. २३ मार्च रोजी खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक सय्यद मुनीर अली सय्यद रियासत अली (६०) यांनी सध्या सालारजंग प्रॉपर्टी असल्याचा दावा करीत असलेल्या शेख शकील शेख छोटू यांच्यासह सहा जणांनी जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार जिन्सी ठाण्यात केली होती. त्यावरून पोलिसांनी शेख शकील याला अटक करीत तात्काळ जामीन दिला होता. यानंतर गेल्या आठवडाभरापासून यावरून दोन्ही गटांत वाद सुरू आहे. त्यातच नव्याने सालारजंग प्रॉपर्टीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करीत असताना मंगळवारी अचानक आर्थिक गुन्हे शाखेसह जिन्सी पोलिसांनी बंदोबस्त मागविला. पोलीस बंदोबस्तात तेथील गोदाम रिकामे करीत कुलूप लावून त्याच्या चाव्या खरेदी-विक्री संघाला दिल्या. तेथील साहित्यही पोलिसांनी जप्त केले. मात्र, या गोदामाला केवळ समोरून कुलूप लावण्यात आले आहे. या जमिनीचा वाद सालारजंग प्रॉपटीर्शी जोडला जात असल्याची चर्चा आहे. शेख शकील व अन्य सहा जणांनी सालारजंग प्रॉपर्टी विकसित करण्यासाठी घेतल्याची कागदपत्रे सादर केल्याचा दावा केला आहे, तर पोलिसांनी ताबाधारकांकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे म्हटले आहे.