बनावट इसारा पावतीच्या आधारे जमीन बळकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:03 AM2021-09-03T04:03:06+5:302021-09-03T04:03:06+5:30
औरंगाबाद : बनावट इसारा पावतीच्या आधारे वृद्धाची आठजणांनी जमीन बळकावली. हा प्रकार १९९१ ते २०१७ या काळात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या ...
औरंगाबाद : बनावट इसारा पावतीच्या आधारे वृद्धाची आठजणांनी जमीन बळकावली. हा प्रकार १९९१ ते २०१७ या काळात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या न्यायालयात घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुना मोंढा येथील चंद्रकांत गणपतराव निकम (वय ६७) यांच्यासोबत २३ ऑगस्ट १९९१ रोजी गट क्र. १५७/१ मध्ये ८० आर, तर १५३ मधील ५८ आर जमीन रायसिंग खेमचंद हरणे, कांतराव लक्ष्मण बनकर, कन्हैय्यालाल बिहारीलाल जैस्वाल, शिवलिंग भीमाशंकर गुळवे, नामदेव रायसिंग हरणे, संजय सर्जेराव औताडे, विनायक यू. पंडित आणि जी. एस. बोर्डे यांनी खरेदी केली होती. या जमिनीची त्यावेळी दुय्यम निबंधक कार्यालयात इसारा पावती व नोटरी करण्यात आली होती. मात्र, कालांतराने या आठही जणांनी जमीन बळकावण्यासाठी जमिनीच्या बनावट इसारा पावती, रद्द पत्र व बनावट संमती पत्रावर निकम यांच्या बनावट स्वाक्षरी केल्या. त्यानंतर ही कागदपत्रे उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात सादर केली. याशिवाय तडजोड झाल्याचे भासवून फेरफार आदेश मिळविले. तसेच या कागदपत्रांआधारे महसूल विभाग व निकम यांची फसवणूक केली. त्यावरून न्यायालयाच्या आदेशाने हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.