विमानतळ धावपट्टी रुंदीकरणासाठी जमीन मोजणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:06 AM2021-01-25T04:06:46+5:302021-01-25T04:06:46+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारास १८२ एकरचे भूसंपादन करण्यासाठी मालमत्ता मोजणी जवळपास पूर्ण झाल्याची माहिती ...
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारास १८२ एकरचे भूसंपादन करण्यासाठी मालमत्ता मोजणी जवळपास पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निर्धारित केलेल्या गटांपेक्षा जास्तीच्या गटातील मालमत्तांची मोजणी केल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही नागरिकांची बांधकामे सुरू असताना त्यांच्या पूर्ण मालमत्तेवर मार्किंग झाल्यामुळे मोबदला मिळणार की मालमत्ता, जमिनी ताब्यात घेतल्यानंतर हेलपाटे मारावे लागणार यावरून नागरिकांत संभ्रम आहे.
१८ जानेवारीपासून धावपट्टी रुंदीकरणासाठी भूसंपादन अनुषंगाने संयुक्त मोजणी सुरू झाली. एका आठवड्यात मोजणी आणि मार्किंग पूर्ण करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाने आधुनिक यंत्रे आणली होती. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि., भूमिअभिलेख कार्यालय व महसूल यंत्रणेच्या समन्वयाने मोजणी करण्यात आली. मार्किंग आणि सीमांकन भूमिअभिलेख विभागाने ठरविले आहे.
सक्षम भूसंपादन अधिकारी म्हणून अद्याप महसूल यंत्रणेतील कुणावर जबाबदारी देण्यात आलेली नाही. मोजणीसाठी भूमिअभिलेख विभागासाठी समन्वयाची मदत केली जात आहे. १५००च्या आसपास मालमत्ता रुंदीकरणात जाण्याची शक्यता आहे. धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी शेतजमिनी घ्याव्यात, नागरिकांची घरे पाडू नयेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
प्राधिकृत अधिकारीपदावर अद्याप कुणी नाही
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अद्याप प्राधिकृत अधिकारी म्हणून कुणावर जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे भूसंपादनात किती मालमत्ता, जमीन जात आहे. मोबदला कसा मिळणार आहे. २०१३च्या भूसंपादन कायद्यानुसार मिळणार की इतर नियमाने देणार याबाबत अजून काहीही स्पष्टता नाही. दरम्यान, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी सांगितले, जिल्हाधिकाऱ्यांनी अजून कुणावर प्राधिकृत अधिकारी म्हणून जबाबदारी दिलेली नाही. येत्या आठवड्यात त्याबाबत स्पष्टता होईल.