खंडपीठाच्या सुरक्षाभिंतीखालील भूभाग खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:02 AM2021-09-03T04:02:26+5:302021-09-03T04:02:26+5:30
औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या सुमारे पाचशे मीटर सुरक्षाभिंतीचा काही भाग खचल्याने अवजड ट्रक गुरुवारी खंडपीठ ...
औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या सुमारे पाचशे मीटर सुरक्षाभिंतीचा काही भाग खचल्याने अवजड ट्रक गुरुवारी खंडपीठ वाहनतळाच्या आवारात उलटला. या घटनेत जीवितहानी झाली नाही; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या सुरक्षाभिंतीच्या कामाचा दर्जा चर्चेत आला.
तीन वर्षांपूर्वी सुरक्षाभिंतीची उंची वाढविताना तीन फुटांपेक्षा जास्त बांधकाम करण्यात आले. मात्र, पायाच्या मजबुतीकडे दुर्लक्ष झाल्याने तो खचल्याचे बोलले जात आहे. भिंतीवर भिंत बांधण्यास कंत्राटदाराने नकार दिला होता. परंतु, शाखा आणि उपअभियंत्यांनी सर्व परवानगीसह ते काम करून घेतले. अभियंता वाघमारे आणि तोंडे यांच्या काळात ते काम झाले. बांधकाम विभागाच्या इमारत डिव्हीजनकडे याबाबत काहीही माहिती नाही. उडवा-उडवीची उत्तरे देऊन प्रत्येकजण हातवर करीत आहे. न्यायालयाच्या कामातच एवढा अंधाधुंदपणा सुरू असेल तर इतर कामांच्या दर्जाविषयी काय सांगणार, असा प्रश्न आहे.
जुन्या बांधकामावरच केले काँक्रिटीकरण
सुरक्षाभिंत डबर कामात केलेली होती. ते काम जुने झाल्यामुळे त्याचे नूतनीकरण करण्याचे ठरले. जुन्या बांधकामाच्या क्षमतेचा विचार न करताच या भिंतीवर वजनदार काँक्रीट टाकण्यात आले. यामुळे जुन्या कामावर प्रचंड भार आला. त्याच ठिकाणी अवजड ट्रक उभा होता आणि काही क्षणातच तो न्यायालयाच्या वाहनतळाच्या दिशेने उलटला.
१९९५ बांधली सुरक्षाभिंत
एन-३, एन-४ च्या लगत न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासून न्यायनगरच्या दिशेने १९९५ साली १० ते १२ फूट उंच भिंत डबर कामासह बांधण्यात आली. जमिनीपासून उंच असलेली भिंत कालांतराने कमजोर झाली. पावसाचे पाणी भिंतीच्या खालून कोर्ट पार्किंगमध्ये जायचे. तसेच सिमेंट रस्त्याचे काम झाल्यानंतर भिंतीची उंची कमी झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने भिंतीची उंची वाढविली.
१८ लाख रुपयांतून झाले काम
न्यायालय आवारातील बंगला क्रं.२ लगत जास्तीचा खर्च झाल्यामुळे या मुख्य सुरक्षाभिंतीचे १८ लाखांतून काम करून घेण्यात आले. इमारत विभागाचे उपअभियंता भदाणे यांनी सांगितले, नवीन बांधकामासाठी प्रस्ताव देण्यात येईल. जुन्या भिंतीवरच काँक्रिटीकरणातून काम करण्यात आले होते. त्याला दोन-तीन वर्षे झाली आहेत.