टिळकनगर येथील तब्बल ३० कोटींची जागा महापालिकेच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:03 AM2020-12-22T04:03:26+5:302020-12-22T04:03:26+5:30
औरंगाबाद : महापालिकेतील तीन वेगवेगळ्या विभागांनी आपले कौशल्य पणाला लावून काम केल्याने त्याचा परिणामही दिसून येत आहे. टिळकनगर येथील ...
औरंगाबाद : महापालिकेतील तीन वेगवेगळ्या विभागांनी आपले कौशल्य पणाला लावून काम केल्याने त्याचा परिणामही दिसून येत आहे. टिळकनगर येथील तब्बल ३० कोटी रुपयांची जागा सोमवारी महापालिकेने प्रदीर्घ लढा दिल्यानंतर ताब्यात घेतली. चार वर्षांपूर्वी महापालिकेने याच जागेचा ताबा घेतला होता. मात्र, तो यशस्वी झाला नव्हता.
महापालिकेच्या एका मोठ्या यशाबद्दल माहिती देताना उपायुक्त अपर्णा थेटे म्हणाल्या, ‘‘टिळकनगर- रवींद्रनगरमध्ये ३६६७.८६ चौरस मीटर जागा ले आऊटमधील आहे. या जागेवर अतिक्रमण करुन वॉचमनची खोली बांधली होती. या बांधकामाच्या विरोधात रवींद्रनगर नागरी कृती समितीचे अध्यक्ष माधवराव कुलकर्णी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. ही मालमत्ता मीर यावर अली खान यांची असून ती प्रतापसिंग राठोड यांनी घेतल्याचा दावा केला जात होता. राठोड यांनी सतीश रुणवाल यांना जीपीए करुन दिला होता. महापालिकेने रुणवाल यांना बांधकाम परवानगी दिली होती, नंतर ती रद्द करण्यात आली. बांधकाम परवानगी रद्द केल्यावर रुणवाल यांनी राज्य शासनाकडे अपील केले. शासनाने रुणवाल यांचे अपील मान्य केले. शासनाच्या निर्णयाला माधवराव कुलकर्णी यांनी पुन्हा न्यायालयात आव्हान दिले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना ती जागा ले आऊटमधील असून त्यावर बांधकाम परवानगी देता येत नाही. दरम्यान चार वर्षांपूर्वी महापालिकेने या जागेवरील अतिक्रमण हटवून ताबा घेतला होता. नंतर हा प्रयत्न यशस्वी ठरला होता.
त्यानंतर हे प्रकरण पुन्हा हायकोर्टात वर्ग करण्यात आले. हायकोर्टाने महापालिकेच्या बाजूने निकाल देताना महापालिकेने त्या जागेवर आपले नाव लावावे असे आदेश दिले. या आदेशाबद्दल रुणवाल यांना काही आक्षेप असेल तर त्यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागावी, असेही हायकोर्टाने नमूद केले. हायकोर्टाच्या आदेशानंतर तीन महिन्यात रुणवाल यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागणे गरजेचे होते, पण त्यांना ते शक्य झाले नाही. दरम्यानच्या काळात महापालिकेने त्या जागेवर ८ नोव्हेंबर रोजी आपले नाव लावले आणि सोमवारी त्या जागेवरील अतिक्रमण काढून जागा मालमत्ता विभागाच्या ताब्यात दिली.
तारेचे कुंपण लावणे सुरू
जागा ताब्यात मिळताच त्या जागेभोवती तारेचे कुंपण घालण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आले. उपअभियंता बी.के. परदेशी यांच्याकडे हे काम सोपविण्यात आले. या कारवाईच्या वेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, उपायुक्त अपर्णा थेटे यांच्यासह नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक जयंत खरवडकर, अतिक्रमण हटाव विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.