लँडलाईन फोनचा आदेश अजुनही गुलदस्त्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:05 AM2021-07-31T04:05:51+5:302021-07-31T04:05:51+5:30
पैठण : शासकीय कार्यालयात सर्रासपणे अधिकारी, कर्मचारी खासगी मोबाईल वापरत असल्याने नागरिकांना त्यांच्याशी संपर्क करताना अनेक अडचणींचा सामना करावा ...
पैठण : शासकीय कार्यालयात सर्रासपणे अधिकारी, कर्मचारी खासगी मोबाईल वापरत असल्याने नागरिकांना त्यांच्याशी संपर्क करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा वापर टाळून आपल्या कार्यालयातील लँडलाईन फोनचा उपयोग करण्याचे आदेश काढले आहेत. दुसरीकडे पैठण तालुक्यातील जवळपास सर्वच कार्यालयातील लँडलाईन फोन बंद असल्याने ते कधी सुरू होतील, असा प्रश्न आहे.
तालुक्यातील महत्त्वाच्या तहसील व पंचायत समिती कार्यालयातील दूरध्वनीदेखील बंद अवस्थेत आहेत हे विशेष. सर्वसामान्य नागरिकांकडे अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक नसल्याने छोट्याशा कामासाठी त्यांना संबंधित कार्यालयात हेलपाटे घालावे लागत असल्याचे चित्र आहे. शासनाच्या आदेशानुसार आतातरी शासकीय कार्यालयातील दूरध्वनी सुरू होऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
राज्य सरकारने कार्यालयातील लँडलाईन फोनचा वापर करावा असे आदेश दिल्यानंतर पैठण तालुक्यातील किती शासकीय कार्यालयाचे लँडलाईन फोन सुरू आहेत, या बाबत आमच्या प्रतिनिधीने आढावा घेतल्यावर जवळपास सर्वच कार्यालयातील दूरध्वनी बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. विशेष म्हणजे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वैयक्तिक मोबाईलचा शासकीय कामासाठी वापर करत असल्याचे दिसून आले. लँडलाईन फोन बंद असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोयीचे वाटते. मात्र सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून आले आहे.
ठराविक कालावधीनंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली होते. यानंतर नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्याचा वा कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होत नाही. यामुळे संबंधित कार्यालयातील कामासाठी नागरिकांना त्या कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागत आहे. दुसरीकडे अधिकारी, कर्मचारी अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन घेत नाही किंवा घेतल्यावर मी मीटिंग, दौऱ्यावर असल्याचे सांगून टाळाटाळ करत असल्याचा अनुभव अनेकांना येतो. वरिष्ठांनाही कर्मचारी, अधिकारी मोबाईलवर कार्यालयात असल्याची बतावणी करतात. मात्र, लँडलाईन फोनवर प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहूनच बोलावे लागते, यामुळे बहुतेक कार्यालयातील लँडलाईन चालू करण्यात कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रस घेतला नसल्याचे समोर आले आहे.
----------
अग्निशमन, तहसील कार्यालयातील दूरध्वनी बंद
महसूल विभागासह अग्निशमन, आरोग्य विभाग या महत्त्वाच्या कार्यालयातील दूरध्वनी बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा लागत असून कर्मचाऱ्याने मोबाईल बंद करून ठेवला तर नागरिकासाठी कार्यालयच बंद, अशी परिस्थिती सध्या शासकीय कार्यालयात दिसून येत आहे.
----------
दूरध्वनी बंद असलेली पैठण तालुक्यातील कार्यालये
पैठण तहसील कार्यालय, नगर परिषद, वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती, अग्निशमन न.प., महावितरण उपविभाग कार्यालय, सहायक निबंधक कार्यालय, कार्यकारी अभियंता पाटबंधारे जायकवाडी विभाग, सहायक कार्यकारी अभियंता दगडी धरण उपविभाग, जायकवाडी कार्यकारी अभियंता नियंत्रण व संपर्क अधिकारी, बसस्थानक पैठण आगार, मराठवाडा प्रशासकीय व प्रशिक्षण प्रबोधिनी, प्राथमिक आरोग्य केंद्र पाचोड, आडूळ, विहामांडवा व बिडकीन, अग्निशमन एम.आय.डी.सी., वजन मापे निरीक्षक, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण यांच्यासह आदी कार्यालयातील दूरध्वनी बंद आहेत.