भाषा आणि शिक्षणाचा व्यवसायात अडसर नाही -धनंजय दातार
By Admin | Published: September 19, 2016 12:05 AM2016-09-19T00:05:48+5:302016-09-19T00:12:06+5:30
औरंगाबाद : नोटा मोजता येण्याएवढे शिक्षण व्यवसायासाठी पुरेसे असून, आपणास मोठे व्हायचे आहे, अशी जिद्द मात्र मनात असायला हवी.
औरंगाबाद : तुम्ही कोणती भाषा बोलता, शिक्षण किती झाले, याचा व्यवसायात कधीच अडसर येत नाही. नोटा मोजता येण्याएवढे शिक्षण व्यवसायासाठी पुरेसे असून, आपणास मोठे व्हायचे आहे, अशी जिद्द मात्र मनात असायला हवी. ग्राहक हा देव असून, तो कोणत्याही धर्माचा असू शकतो, त्यामुळे सर्व धर्मांचा आदर करा, असा सल्ला प्रख्यात उद्योजक, मसालाकिंग धनंजय दातार यांनी रविवारी येथे दिला.
अ. भा. ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने बीड बायपासवरील गुरूलॉन्स येथे आयोजित ब्रह्मोद्योग प्रदर्शन आणि ब्राह्मण उद्योजक संमेलनातील परिसंवादात दातार यांनी अतिशय परखड आणि नेमकेपणाने आपला जीवनप्रवास उलगडत यशाची गुपितेही सांगितली. डॉ. नचिकेत वाचासुंदर यांनी दातार यांची मुलाखत घेतली.
अकोला येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि लहानपण अतिशय गरिबीत काढलेल्या दातार यांनी वयाच्या केवळ विसाव्या वर्षी दुबई गाठली. वडिलांबरोबर दुकानामध्ये अहोरात्र काम करीत यशाची एकेक पायरी सर केली. हे सारे करताना आपल्याला खूप मोठे व्हायचे आहे, हे मी कधीही विसरलो नाही आणि आजही तेच उद्दिष्ट माझ्यासमोर सतत असते, असे त्यांनी सांगितले.
इंग्रजीचा बाऊ करूनका
व्यवसायाकरिता विशिष्ट प्रकारचेच शिक्षण हवे असे म्हणणे साफ चुकीचे असल्याचे सांगत नोटा मोजण्यापुरते शिक्षणही पुरेसे आहे. व्यवहारज्ञान, धाडस, सारासार विवेकबुद्धी आणि ‘मौका देखकर चौका मारना’ जमायला हवे. इंग्रजी भाषेचे अकारण
स्तोम माजवू नका, ती येत नसेल तरी काही बिघडत नाही, असे त्यांनी आपल्या अनुभव कथनातून सांगितले.
स्वत:च्या पैशाने व्यवसाय न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. बँकांकडून कर्ज काढा, त्यांचे हप्ते व्यवस्थित फेडा, स्वत:ची पत निर्माण करा. धंद्यातून पैसा, नफा मिळविणे हे जरी ध्येय असले तरी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, मिळविलेल्या पैशाचा उपभोगही घ्या, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी
ब्राह्मणांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, पौरोहित्य करणाऱ्यांना दरमहा पाच हजार मानधन द्यावे, ब्राह्मणविरोधी लिखाण करणाऱ्या पुस्तकांवर बंदी घालावी, या आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु राज्यात सत्ताबदल झाला. युती सरकार आल्यानंतर ब्राह्मण समाजाने आनंद व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने ब्राह्मण मुख्यमंत्री राज्याला मिळाला; परंतु त्यांनी ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणे टाळले, अशा शद्बात अ.भा. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
————
गुणवत्तेचा वापर करा
गुणवत्ता ही ब्राह्मण समाजाला जन्मजात मिळालेली देण आहे. या गुणवत्तेचा तरुणांनी प्रत्यक्ष कृतीत वापर करावा, असे आवाहन बडवे इंजिनिअरिंगचे श्रीकांत बडवे यांनी केले. यश कधी एकट्याने मिळत नसते तर त्यासाठी चांगल्या लोकांची टीम तुमच्याबरोबर हवी. आपण काहीतरी वेगळे, दर्जेदार काम करायला लागलो तर यश फार दूर नसते, असेही त्यांनी सांगितले. उद्योजक मिलिंद कंक, सीए उमेश शर्मा यांचेही भाषण झाले.