कंदील, चिमण्या, गॅसबत्ती झाल्या इतिहास जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:05 AM2021-06-19T04:05:02+5:302021-06-19T04:05:02+5:30

लासूरगाव : ज्यावेळी ग्रामीण भागात वीज पोहोचली नव्हती, तेव्हा रात्रीच्या वेळी अंधार घालविण्यासाठी घराघरांमध्ये कंदील, चिमण्या तसेच रॉकेलबत्तींचा वापर ...

Lanterns, sparrows, gas lamps accumulated history | कंदील, चिमण्या, गॅसबत्ती झाल्या इतिहास जमा

कंदील, चिमण्या, गॅसबत्ती झाल्या इतिहास जमा

लासूरगाव : ज्यावेळी ग्रामीण भागात वीज पोहोचली नव्हती, तेव्हा रात्रीच्या वेळी अंधार घालविण्यासाठी घराघरांमध्ये कंदील, चिमण्या तसेच रॉकेलबत्तींचा वापर केला जात होता. त्यावेळी रॉकेल हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. मात्र, कालौघात गावागावात आता वीज पोहोचली असून कंदील, चिमण्या, दिवे आता इतिहास जमा झाली असून, रॉकेलही मिळेनासे झाले आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ९० च्या दशकापर्यंतही अनेक गावे विजेविना होती. त्यावेळी अंधार घालविण्यासाठी गोड्या तेलासह रॉकेलवरील दिव्यांना विशेष महत्त्व होते. विविध आकारातील रंगबेरंगी दिवे त्यावेळी विक्रीला येत होती. गरिबाच्या घरी छोटी चिमणी प्रकाशाचे काम करी, अनेक घरी काचेच्या बाटलीच्या झाकणाला छिद्र पाडून त्यात कपड्याची वात घालून दिवा तयार केला जात असे. तर परिस्थितीने श्रीमंत असलेल्या कुटुंबाकडे वेगवेगळे दिवे किंवा रॉकेलबत्तीचा वापर केला जात होता. यासाठी ग्रामीण भागात इंधन म्हणून सर्रास रॉकेलचा वापर केला जात होता. मात्र, आता रॉकेलचा पुरवठा पूर्णपणे थांबला आहे. लाइट आल्यानंतरही भारनियमनामुळे अनेक घरांत दिवे वापरले जात होते, मात्र इन्व्हर्टर, चार्जिंग लाइट, मेणबत्तीमुळे त्यांचा वापर बंद झाला आहे.

चौकट

चौकातला कंदील

पूर्वीच्या काळी गावाला प्रकाशमय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने चौकाचौकात मोठमोठे कंदील लावण्यात येत असे. संध्याकाळ झाली की, ग्रामपंचायतीचा कर्मचारी रॉकेलची कॅन घेऊन कंदिलाची साफसफाई करीत त्यात रॉकेल भरून तो प्रज्वलित करीत असे. या प्रकाशात काही शाळकरी मुले अभ्यास करीत असत. आता ही जागा स्ट्रीट लाइटने घेतल्यानंतर चौकातला कंदील काळाच्या पडद्याआड गेला आहे.

चौकट

श्रीमंतांच्या घरी असायची रॉकेलबत्ती

गावातील श्रीमंत घरांमध्ये, दुकाने, बाजार तसेच यात्रेमध्ये जास्त प्रकाशासाठी रॉकेलबत्ती वापरली जात असते. लग्नाच्या वरातीमध्येही प्रकाशासाठी रॉकेल बत्ती डोक्यावर घेऊन काही जण वरातीपुढे चालत असे. जास्त प्रकाश देत असल्याने या बत्तीचे ग्रामस्थांना विशेष आकर्षण होते.

कोट

आमच्या काळात लाइट नव्हती तरी जास्त समस्या निर्माण होत नव्हत्या. रॉकेलही मुबलक मिळायचे. लग्नाच्या वरातीमध्ये गॅसबत्तीचा वापर व्हायचा. कंदील, चिमण्यांमुळे संध्याकाळी लवकर आवरून लवकर झोपत असू व पहाटेच सर्व गाव जागे होत असे. आता सुविधा जरी वाढल्या तरी समस्याही वाढल्या आहेत.

- दत्तू पाटील काळुंके, लासूरगाव.

कोट

सायंकाळचे चार वाजले की, घरात कंदील, चिमण्या स्वच्छ करून त्यात रॉकेल भरावे लागत होते. या प्रकाशातच आम्ही स्वयंपाक करून एकत्र सर्व जण जेवायचो. आता टीव्ही पाहत जेवतात. तेव्हा डोळ्यांचीही दृष्टी चांगली होती. आता लहान वयातच चष्मा लागतो. लाइट आली, जीवन सुकर झाले, मात्र मनुष्य आळशीही झाला आहे.

-शकुंतलाबाई कारभारी आढाव, लासूरगाव

170621\img_20210610_180643.jpg

दत्तू पाटील काळुंके

Web Title: Lanterns, sparrows, gas lamps accumulated history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.