जायकवाडीवरील जलप्रकल्पातून मोठ्याप्रमाणात विसर्ग; जिल्ह्यातील ३५ गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 11:39 AM2022-07-13T11:39:32+5:302022-07-13T11:41:06+5:30
तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.
औरंगाबाद : जायकवाडीवरील जलप्रकल्पातून सध्या ८० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग चालू आहे. गंगापूर, वैजापूर या दोन्ही तालुक्यांतील नदीकाठच्या ३५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. यंदाच्या पावसाळ्यात नदीला पहिल्यांदाच पूरसदृश्य परिस्थती निर्माण झाली असून, जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी ४० टक्के झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली असून, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तहसील कार्यालयाकडून आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा घेत आहेत.
नाशिकच्या पुराचे पाणी दाखल झाल्याने गेल्या २४ तासात जायकवाडीच्या पाणीपातळीत पाऊन फुटाने वाढ झाली असून ५६.१९ दलघमी ( २ टीएमसी) पाण्याची भर पडली आहे. मंगळवारी रात्री धरणात ४५९३८ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू होती. वरच्या धरणातील विसर्ग लक्षात घेता आवक वाढणार असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. दरम्यान धरणाचा जलसाठा मंगळवारी सायंकाळी ४०% पेक्षा जास्त झाला होता.
नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी सोमवारी मध्यरात्री जायकवाडी धरणात येऊन धडकले. जायकवाडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अतिवृष्टी सुरू असून तेथील धरणातून गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू आहेत. दरम्यान, जायकवाडी धरणात मंगळवारी सकाळपासून आवक वाढत असल्याचे दिसून आले सायंकाळी ७ वाजेस धरणात ४५९३८ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील धरण समुहापैकी दारणा धरणातून १५०८८ क्युसेक्स, कडवा धरणातून ३५१७ क्युसेक्स, गंगापूर धरणातून १००३५ क्युसेक्स असा मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात येत होता. या सर्व धरणातील पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात येते. तेथून गोदावरी पात्रात ७८२७६ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने गोदावरी पात्रात मंगळवारी विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरी नदीला पुर आला आहे. प्रशासनाने नाशिक ते गंगापूर पर्यंत गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.