अनावश्यक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:02 AM2021-03-15T04:02:21+5:302021-03-15T04:02:21+5:30
औरंगाबाद : कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी या उद्देशाने शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पहिल्या दिवशी ...
औरंगाबाद : कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी या उद्देशाने शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पहिल्या दिवशी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशी नागरिकांनी लॉकडाऊनची कोणतीही तमा बाळगली नाही. दिवसभर नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यांवरून फिरताना दिसून आले. पोलिसांकडूनही विशेष काळजी घेण्यात आली नाही.
शनिवारी शहरात ५९५ म्हणजे जवळपास ६०० रुग्ण आढळून आले. कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी म्हणून प्रशासनाने रात्री नऊनंतर संचारबंदी लावली. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला. शनिवारी औरंगाबाद शहरात नागरिकांनी लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दूध, भाजीपाला, मेडिकल आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. तरी नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले नाही.
रविवारी दिवसभर नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून आले. जुन्या शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. विशेष बाब म्हणजे नागरिक कोणतेही कारण नसताना रस्त्यावरून फिरत असताना दिसून आले. दुपारी तीननंतर तर शहरात लॉकडाऊन आहे किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. औरंगपुरा भाजीमंडईच्या परिसरात काही फळविक्रेत्यांनी दुकाने उघडली होती. खरेदीसाठी ग्राहक नसले तरी दुकाने उघडी होती. रविवारी काही ठिकाणी मासविक्रेत्यांनी दुकाने उघडली होती, मात्र त्यांच्याकडे खरेदीसाठी ग्राहकच नव्हते.
शुक्रवारीच मोठ्या प्रमाणात खरेदी
प्रशासनाने लॉकडाऊन दोन दिवसांचा असणार हे जाहीर केलेले असतानाही नागरिकांनी भीतीपोटी शुक्रवारी मोठ्याप्रमाणात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. बाजारात भाजीपाला शिल्लक राहिलेला नव्हता. फळविक्रेत्यांनी अत्यंत कमी दराने माज विकून टाकला. लॉकडाऊन अवधी वाढेल, अशी भीती नागरिकांना वाटत आहे.
६० टक्के दूध शिल्लक
लॉकडाऊनमध्ये दूधविक्रेत्यांना सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकान उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. शनिवारी दिवसभर नागरिक दूध खरेदीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे प्रत्येक दूध विक्रेत्याकडे जवळपास ६० टक्के दूध पडून होते. रविवारी सकाळपासून मोजकेच नागरिक दूध खरेदीसाठी येत होते. रविवारीही दूध मोठ्या प्रमाणात शिल्लक राहण्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला.