बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी पोकळी; नाराजांसह संधी न मिळालेल्यांच्या आशा पल्लवित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 01:09 PM2022-07-02T13:09:02+5:302022-07-02T13:09:38+5:30

मध्य, पश्चिमसह वैजापूर, पैठण, सिल्लोडमधील दुसऱ्या फळीला संधी

Large void in Shiv Sena due to mutiny; The hopes of those who did not get a chance with the disgruntled are dashed | बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी पोकळी; नाराजांसह संधी न मिळालेल्यांच्या आशा पल्लवित

बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी पोकळी; नाराजांसह संधी न मिळालेल्यांच्या आशा पल्लवित

googlenewsNext

- विकास राऊत
औरंगाबाद :
जिल्ह्यात मागील ३० वर्षांतील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले. मात्र, तो आनंद अडीच वर्षेच टिकला. त्यामुळे आता जिल्ह्यातील ही सगळी पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने प्रयत्न सुरू केले आहेत, तर या सगळ्या बंडखोरीमुळे शिवसेनेतील नाराजांच्या, संधी न मिळालेल्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यातील काही मतदारसंघांत दुसरी फळी विकसित होऊच दिली गेली नाही. त्यामुळे शिवसेनेसमोर पक्षबांधणीचे मोठे आव्हानदेखील आहे.

पश्चिम मतदारसंघ- २००९ साली पहिल्यांदा संजय शिरसाट यांना पक्षाने संधी दिली होती. त्यावर्षी बन्सीलाल गांगवे यांनीदेखील उमेदवारीवर दावा केला होता; परंतु पक्षाने शिरसाट यांना संधी दिली. त्यांना आता पुन्हा पक्षाकडून अपेक्षा आहेत. तसेच ऋषी खैरे, बाळू गायकवाड यांचीदेखील नावे आता पक्ष वर्तुळात समोर येऊ लागली आहेत.

मध्य मतदारसंघ- मध्य मतदारसंघात किशनचंद तनवाणी यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच शहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनाही उमेदवारीची अपेक्षा आहे. आ. जैस्वाल यांची बंडखोरी या दोघांपैकी कुणाच्या पथ्यावर पडते, हे आगामी काळात कळेल. सगळी गणितं २०२४ पूर्वी स्पष्ट होतील.

वैजापूर मतदारसंघ- या मतदारसंघातून आ. रमेश बोरणारे यांनी शिवसेनेशी नाते तोडून शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. माजी आ. आर. एम. वाणी यांचे चिरंजीव सचिन वाणी किंवा ऐनवेळी भाजपतून आयात होणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. बोरणारे यांच्या विरोधात शिवसेनेचा गेल्या आठवड्यात मोठा मेळावा झाल्यामुळे तालुक्यातील मोठा जनाधार अजून तरी सेनेसोबत असल्याचे दिसते.

पैठण मतदारसंघ- या मतदारसंघातून रोहयो मंत्री राहिलेले आ. संदीपान भुमरे यांनी बंडखोरी केल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भुमरे यांनी तालुक्यात दुसरी फळी ताकदवर होऊच दिली नाही. इच्छा व्यक्त करणाऱ्यांचा ते पत्ता कट करायचे, अशी तक्रार गेल्या आठवड्यात संतप्त शिवसैनिकांनी मांडली. पक्षानेदेखील चूक मान्य केली. मनोज पेरे हे सध्या तालुकाप्रमुख असून, त्यांना संधी मिळू शकते. तर ऐनवेळी आयात उमेदवारावर शिवसेनेला पैठण लढवावे लागेल.

सिल्लोड मतदारसंघ- आ. अब्दुल सत्तार यांच्या बंडखोरीमुळे सिल्लोडमध्ये शिवसेनेला नवीन चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. आजवर शिवसेनेने त्या मतदारसंघात उमेदवार देता येईल, असे संघटनच केलेले नाही. युतीमध्ये भाजपच्या वाट्याला तो मतदारसंघ दिला गेला. २०१४ साली युती तुटल्याने मिरकर यांना संधी मिळाली होती. आता त्या मतदारसंघात सत्तार सेनेविरोधात शिवसेना काय नियोजन करते, याकडे लक्ष आहे.

Web Title: Large void in Shiv Sena due to mutiny; The hopes of those who did not get a chance with the disgruntled are dashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.