गेल्या १० वर्षांपासून समाजाने वाळीत टाकलेल्या कुटुंबाची न्यायासाठी औरंगाबाद पोलीसांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:09 PM2018-01-29T13:09:47+5:302018-01-29T13:16:35+5:30
सामाजिक बहिष्कार, वाळीत टाकण्याची प्रथा बंद व्हावी यासाठी अत्यंत कडक कायदे करण्यात आलेले असतानाही औरंगाबाद शहरात अहिर (नंदवंशी) समाजातील एका कुटुंबाला मागील दहा वर्षांपासून वाळीत टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
औरंगाबाद : सामाजिक बहिष्कार, वाळीत टाकण्याची प्रथा बंद व्हावी यासाठी अत्यंत कडक कायदे करण्यात आलेले असतानाही औरंगाबाद शहरात अहिर (नंदवंशी) समाजातील एका कुटुंबाला मागील दहा वर्षांपासून वाळीत टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोणतेच कारण नसताना समाजाने घेतलेल्या या भूमिकेमुळे संबंधित कुटुंबाने न्याय मिळविण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे. आतापर्यंत कोणाकडूनही न्याय न मिळाल्याची तक्रार त्यांनी ‘लोकमत’कडे केली आहे.
बीबी-का-मकबरा परिसरातील राजू लालचंद झाडीवाले यांच्या कुटुंबाला २००७-०८ पासून वाळीत टाकण्यात आले आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आपण अहिर (नंदवंशी) गवळी असून, समाजाने मागील काही वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, सामूहिक सुख-दु:खांपासून आपल्याला वाळीत टाकले आहे. सामाजिक प्रतिष्ठेला ठेस लावणारी ही बाब असून, कुटुंबातील आई, भाऊ, बहीण, मुलांवरही या गंभीर गोष्टीचा परिणाम होत आहे. समाजाच्या या भूमिकेमुळे आमचे मानसिक संतुलनही बिघडले आहे. समाजातील सहा प्रतिष्ठित मंडळींवर जात पंचायत कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. समाजातील सहा प्रतिष्ठित मंडळींना प्रोत्साहित करणार्या पाच इतर मंडळींची नावेही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
तक्रार अर्जाची चौकशी सुरू
झाडीवाले कुटुंबियांचा बेगमपुरा पोलिसांनी तक्रार अर्ज घेतला. संबंधितांचे जाब- जबाब घेण्यात आले . या प्रकरणात वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वरिष्ठांना रिपोर्ट करण्यात येणार असल्याचे उपनिरीक्षक शेख यांनी सांगितले.