मागील २५ वर्षात ४० बोअर गेले व्यर्थ, आता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:02 AM2021-07-20T04:02:16+5:302021-07-20T04:02:16+5:30
ऐतिहासिक जामा मशिदीत लागले फक्त अडीच फुटावर पाणी निसर्गाची किमया : पाणीप्रश्न कायमचा निकाली निघण्याची आशा औरंगाबाद : ...
ऐतिहासिक जामा मशिदीत लागले फक्त अडीच फुटावर पाणी
निसर्गाची किमया : पाणीप्रश्न कायमचा निकाली निघण्याची आशा
औरंगाबाद : पाणी टंचाईला कायम तोंड देणाऱ्या ऐतिहासिक जामा मशिदीच्या विश्वस्तांनी गेल्या २५ वर्षात परिसरात ४० हातपंप घेतले. ते सर्व कोरडेठाक निघाले. पण गेल्या आठवड्यात अन्य कामासाठी केलेल्या अडीच तीन फूट खोदकामात पाण्याचा झरा लागला. तेथे अधिक खोदाई केली असता पाण्याचे उकळेच फुटले. ५ अश्वशक्तीचे दोन वीज पंप लावूनही पाणी हटण्याचे नाव नाही. हे झरे शाश्वत असल्याचे घाटत असल्याने मशीद विश्वस्तांनी आनंद व्यक्त केला.
जामा मशीदमध्ये दर शुक्रवारी विशेष नमाज अदा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येतात. दर गुरूवारी मर्कजचा इस्तेमा सुद्धा होतो. अरबी भाषा शिकण्यासाठी शेकडो विद्यार्थी तेथे राहतात. शहरातील अनेक भाविक लग्नासाठी जामा मशीद परिसरालाच पसंती देतात.
ही मशीद मलीक अंबर यांच्या काळात उभारण्यात आली. मुगल बादशाह औरंगजेब यांनी मशिदीचा विस्तार केला. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये मशीद, मदरसा परिसर नयनरम्य, सुंदर करण्यात आला. भाविकांना हात पाय धुण्यासाठी (वजू) पाणी खूप लागते. बुढीलेन परिसरातील काही विहिरींवरून पाईपलाईन करून मशिदीत पाणी घेण्यात आले होते, तरीही पाणीटंचाई भासत होती.
असा सापडला झरा...
आठ दिवसांपूर्वी व्हीआयपी रोडलगत मशीद परिसरात जलकुंभ उभारण्यासाठी खोदकाम करण्यात आले. यात पाण्याचा छोटा झरा सापडला. कुतूहल वाढल्याने तेथे अधिक खोदले असता पाण्याचे मोठे झरे लागले. मग ३० फुटापेक्षा अधिक खोदकाम करण्यात आले. तेव्हापासून ५ अश्व शक्तीच्या दोन वीज पंपाने पाण्याचा सतत उपसा सुरू आहे. पण पाणी हटण्याचे नाव नाही. आता येथे विहीर बांधण्यात येणार आहे, असे मौलाना नसीम मिफ्ताई यांनी सांगितले. ३ लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ येथे बांधण्यात येईल.
अल्लाहची कृपाच म्हणावी
मागील अनेक दशकांपासून आम्ही पाण्यासाठी सर्व प्रयत्न करून थकलो होतो. अल्लाहच्या कृपेने मशीद परिसरात पाण्याचा मोठा चष्मा (झरा) सापडला आहे. पाणीही खूप आहे. भविष्यात आमचा पाण्याचा प्रश्न सुटणार हे निश्चित.
मौलाना मोईज फारूकी, जामा मशीद