द्राक्षबागांना अखेरची ‘घरघर’
By Admin | Published: June 12, 2014 12:48 AM2014-06-12T00:48:13+5:302014-06-12T01:36:59+5:30
एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळ असंतुलित पर्जन्यमान कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी, सोबतच गारपीटीचा तडाखा यामुळे तालुक्यातील द्राक्ष बागायतदार मोठ्या अडचणीत आले
एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळ
असंतुलित पर्जन्यमान कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी, सोबतच गारपीटीचा तडाखा यामुळे तालुक्यातील द्राक्ष बागायतदार मोठ्या अडचणीत आले असून, सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत असल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील द्राक्ष बागांना अखेरची घरघर लागली आहे़ परिणामी पंचेवीस हेक्टर्सवरील द्राक्ष बागा मोडित निघाल्याचे चित्र दिसून येत आहे़
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील घरणी, साकोळ डोंगरगाव, पांढरवाडी आदी प्रकल्पांमुळे सिंचन क्षेत्र वाढले असले तरी तालुक्यातील फळबागा मात्र घटत चालल्या आहेत़ दहा वर्षापासून तालुक्यात जवळपास २५ हेक्टर्स जमिनीवर द्राक्ष बागेची लागवड करण्यात आली होती़ यात थेरगाव, लक्कडजवळगा, शेंद, कानेगाव, शिरूर अनंतपाळ, येरोळ आदी गावांचा समावेश सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत आहे़ त्यातच त्यांना शासनाकडून फारशी मदत मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत़ गत दोन-तीन वर्षापासून तालुक्यात अनावृष्टी झाल्याने मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले होते़ तर पाणी पातळी खालावल्याने विहिर, बोअर कोरडेठाक पडले होते़ तेव्हा टँकरने पाणी पुरवठा करून द्राक्ष बागा जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शिरूर अनंतपाळचे द्राक्ष बागायतदार शेतकरी गुरुनाथ सिंदाळकर यांनी केला होता़ परंतु, मार्च महिन्यात झालेल्या गारपीटीने तर त्यांची द्राक्ष बाग पूर्णत: उद्धवस्त झाली़ त्याचा पंचनामा झाला परंतु, मदत मात्र अद्यापि मिळाली नसल्याने त्यांनी दोन हेक्टर्स द्राक्ष बाग मोडून काढण्यासाठी मजुरांना गुत्ते दिले असल्याचेही सिंदाळकर यांनी सांगितले़
५१ हजाराला गुत्ते़़़
द्राक्ष बागेस गारपीटीचा फटका बसल्याने द्राक्षाचे मोठे नुकसान झाले़ लागवडीचा खर्चसुद्धा पदरी पडला नसल्याने आगामी खरीप हंगामातील तरी पिके पदरी पडतील या अपेक्षेने ५१ हजार रूपयास भिवाजी चव्हाण या मजुरास गुत्ते देऊन बाग मोडीत काढण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले़ असाच काहीसा कटू अनुभव इतर गावातील शेतकऱ्यांना आला असल्यानेच एकंदर २५ हेक्टर्सवरील द्राक्ष बागा मोडित निघाल्या आहेत़
केवळ एक हेक्टर शिल्लक़़़
तालुक्यात सर्व प्रकारचे आघात सहन करून शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला होता़ परंतु, मार्च महिन्यात सतत अठरा दिवस गारपीट झाली़ त्यानंतरही आजतागायत वादळी पावसाचा तडाखा सुरुच असल्याने अनेक गावातील बागा मोडित निघाल्या आता केवळ एक हेक्टर्स द्राक्ष बाग शिल्लक राहिल्याचे चित्र दिसत आहे़
योग्य दर नाहीत़़़
याबाबत येथील तालुका कृषी अधिकारी डी़बी़सुतार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नैसर्गिक आपत्ती हे तर प्रमुख कारण आहेच त्याचबरोबर महागाई मजुरांची समस्या आणि लागवडीचा खर्च वाढला़ परंतु, द्राक्षांना योग्य दर मिळत नसल्याने द्राक्ष बागा मोडित निघत आहेत़