शेवटी माणुसकी धावली; पोटच्या लेकरांनी असमर्थता दर्शवल्याने समाजसेवकांनी दिला वृद्धेला अग्निडाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 07:24 PM2021-06-17T19:24:46+5:302021-06-17T19:25:15+5:30
सुरत येथे एका कंपनीत काम करणाऱ्या 2 मुलांनी आई व वडील यांना ४ वर्षांपूर्वी चिंचपूर येथील एका वृद्धाश्रमात आणून सोडले.
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड ( औरंगाबाद ) : गेल्या 4 वर्षांपासून दोन्ही मुलांनी वृद्धाश्रमात सोडलेल्या आईचे अखेर प्यारॅलीसेस व वर्धापकाळाने निधन झाले. पोटच्यामुलांना संपर्क न झाल्याने त्या 75 वर्षीय वृद्धेला समाजसेवकांनी खांदा देऊन अग्निडाग दिल्याची घटना चिंचपूर येथे बुधवारी घडली. त्यांच्या मुलींशी संपर्क झाला मात्र अंतिम दर्शन घेण्यासाठी तिने नकार दिला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरत येथे एका कंपनीत काम करणाऱ्या पोटच्या 2 मुलांनी आई शशीकलाबाई पवार ( 75 ) व वडील चुनीलाल पवार ( 80 , रा.फुलंब्री ) यांना ४ वर्षांपूर्वी चिंचपूर येथील एका वृद्धाश्रमात आणून सोडले. यानंतर त्यांची एकदाही विचारपूस केली नाही. पालक वारंवार संपर्क करतील म्हणून फोन नंबर देखील दिला नाही. यामुळे शशिकला यांच्या मृत्युनंतर त्यांच्या मुलांशी संपर्क करता आला नाही. तर मुलीला माहिती दिली असता, हे मुलांचे काम आहे असे सांगून अंत्या दर्शनाला देखील येणे टाळले. याची माहिती मिळताच मदतीला माणुसकी समूहाची टिम धावून आली. त्यांनी वृद्धेच्या मृतदेहाला खांदा देत अग्निडाग दिला. दरम्यान, मागील वर्षी चुंनीलाल पवार याचे ही याच वृद्धाश्रमात वर्धापकाळाने निधन झाले होते. त्यावेळी सुद्धा त्यांच्या मुलांशी संपर्क न झाल्याने समाज सेवकांनीच अंतिम संस्कार केले होते .
शीवप्रभा चारेटेबल ट्रस्ट्, सुलक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचे अनिल लुनिया, परशरामजी नरावडे, बद्रीनाथ भालगडे, समाजसेवक सुमित पंडित, प्रशांत दद्दे, बाळासाहेब राठोड, जगन शिरसाट, किशोर माने, गोकुळ खटावकर, जितेंद्र निंबाळकर, संतोष शळके, चद्रकांत गीते, निलेश चौथे, कचरु सुरडकर, संदीप पाठक, कृष्णा दनके, एकनाथ आगाम, सागर दनके, परमेश्वर दनके, कृष्णा उमक व माणुसकी समुहाचे सर्व सभासद मदतीसाठी धावले.
त्यांना' दुःख देण्याचा आमचा काय अधिकार
आई-वडिलांना कोणत्याही परीस्थितीमध्ये एकटे सोडून देणे ही माणुसकी नाही. ज्यांच्यामुळे जग पाहिले त्यांना दुःख देण्याचा अधिकार नाही.
- सुमित पंडित समाजसेवक औरंगाबाद