‘समांतर’च्या कंपनीला शेवटचे निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:46 PM2018-12-25T23:46:08+5:302018-12-25T23:46:44+5:30
समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी महापालिका प्रशासन कंपनीला शेवटचे निमंत्रण देणार आहे. ५ जानेवारी रोजी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी महापालिकेच्या कोणत्याच निमंत्रणाला प्रतिसाद द्यायला तयार नाही.
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी महापालिका प्रशासन कंपनीला शेवटचे निमंत्रण देणार आहे. ५ जानेवारी रोजी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी महापालिकेच्या कोणत्याच निमंत्रणाला प्रतिसाद द्यायला तयार नाही. कंपनीतील मुख्य भागीदार बदलण्याची मुभा द्यावी या अटीवर कंपनी ठाम आहे. महापालिका ही अट कदापिही बदलू शकत नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न मनपाकडून करण्यात येत आहे.
महापौर नंदकुमार घोडेले यांनी बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी दोनदा कंपनीसोबत बैठक झाली आहे. प्रत्येक बैठकीत कंपनीने भागीदार बदलण्याची मुभा द्या, महापालिकेने मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेण्याची मुभा द्यावी, जुनी थकबाकी ५० कोटी द्यावी आदी अटी टाकल्या आहेत. या गंभीर पेचात महापालिकेने राज्य शासनाच्या तीन वेगवेगळ्या विभागांकडे अभिप्राय मागविले. आजपर्यंत मनपाला उत्तर मिळाले नाही. समांतर जलवाहिनीचे पैसे मनपाकडे पडून आहेत. तरीही काहीच करू शकत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. त्याचा अंतिम न्याय निवाडाही होत नाही. कंपनी पुन्हा कामही करायला तयार नाही. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी स्वंतत्र निविदाही मनपा काढू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार मनपाला सूचित केले होते की, कंपनीसोबत बसून अंतिम निर्णय घ्या. मनपाने आतापर्यंत चार ते पाच वेळेस प्रयत्न केले. कंपनी मनपाला सकारात्मक प्रतिसाद देण्यास तयार नाही. आता ५ जानेवारी रोजी कंपनी बैठकीला उपस्थित राहील किंवा नाही, यावर साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.