'अखेरचा जय महाराष्ट्र'; माजी जिल्हा प्रमुखांनी कृष्णकुंजवरून प्रतिसाद नसल्याने मनसे सोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 12:56 PM2022-03-08T12:56:30+5:302022-03-08T13:03:09+5:30
जानेवारी २०२० मध्ये दाशरथे यांनी शिवसेनेसोबत असलेली ३० वर्षांची नाळ तोडून मनसेचा झेंडा हाती घेतला होता.
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस अगोदर पक्षाला एक धक्का बसला आहे. १४ डिसेंबर २०२१ रोजी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखपद काढून घेतल्यानंतर अडगळीला पडलेले सुहास दाशरथे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले. अडीच महिन्यात पक्षप्रमुखांनी एकदाही संपर्क साधला नाही, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनीदेखील विचारात घेण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे दाशरथे यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
जानेवारी २०२० मध्ये दाशरथे यांनी शिवसेनेसोबत असलेली ३० वर्षांची नाळ तोडून मनसेचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या नियुक्तीने पक्षात दोन गट पडले. विद्ममान जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर विरुद्ध दाशरथे असा शीतसंघर्ष पक्षात सुरू झाला. त्यानंतर कोरोना महामारीची साथ सुरू झाली. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात दाशरथे यांनी आंदोलने केली. तसेच सेनेच्या मोर्चा विरोधातही बॅनरबाजी केली. ही पक्षाची संस्कृती नाही, असा ठपका दाशरथे यांच्यावर ठेवून त्यांचे पद काढून पुन्हा खांबेकर यांना देण्यात आले. यातूनच नाराज झालेले दाशरथे हे मनसैनिक म्हणून कार्यरत राहिले. आज पक्षप्रमुख बोलवतील, उद्या बोलवतील, अशा अपेक्षेवर असलेले दाशरथे यांना काही कृृष्णकुंजवरून सांगावा आला नाही. शेवटी त्यांनी सोमवारी सोशल मीडियातून मनसेला जय महाराष्ट्र केल्याचे जाहीर केले. दरम्यान, दाशरथे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मनसे सोडण्याचा निर्णय मी घेतला आहे.
भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता
दाशरथे हे पुन्हा शिवसेनेत जातील, असे बाेलले जात आहे. परंतु आता त्यांना शिवसेनेत प्रवेश मिळणे अवघड आहे. आणि जर प्रवेश मिळाला तर त्यांना कधी व कोणते पद मिळणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे दाशरथे हे भाजपत जाण्याची दाट शक्यता आहे. पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा भाजपला किती फायदा होईल, हे आताच सांगता येणे अवघड आहे.