महापौरांची आज शेवटची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:16 AM2017-10-16T01:16:15+5:302017-10-16T01:16:15+5:30
महापौर बापू घडमोडे यांचा कार्यकाळ २८ आॅक्टोबर रोजी संपत आहे. त्यांच्या कार्यकाळातील शेवटची सर्वसाधारण सभा उद्या, १६ आॅक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापौर बापू घडमोडे यांचा कार्यकाळ २८ आॅक्टोबर रोजी संपत आहे. त्यांच्या कार्यकाळातील शेवटची सर्वसाधारण सभा उद्या, १६ आॅक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित केली आहे. २० जुलै २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी कोणाला न सांगता ऐनवेळी अनेक ठराव मंजूर करून घेतले. एकानंतर एक वादग्रस्त ठराव बाहेर येऊ लागल्याने भाजपची बरीच कोंडी झाली आहे. उद्याच्या सर्वसाधारण सभेत कोणते वादग्रस्त ठराव मंजूर होतात, याकडे मनपा वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवसेना-भाजपमधील करारानुसार दहा महिन्यांसाठी भाजपला महापौरपद देण्यात आले होते. ज्येष्ठ नगरसेवक म्हणून पक्षाने बापू घडमोडे यांच्यावर विश्वास टाकला. भाजपच्या महापौरांसाठी शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी तब्बल १०० कोटींचा निधी मंजूर केला. दुर्दैवाने महापौरांचा कार्यकाल संपल्यावर या रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. भाजपच्या महापौरांना नारळ फोडता येईल किंवा नाही, यावर आता साशंकता व्यक्त करण्यात येत
आहे.
मनपा प्रशासनाकडून काही विषय मंजुरीसाठी ठेवण्यात येतील. यामध्ये एका बडतर्फ अधिकाºयाला २०१२ ते १६ पर्यंतचे सर्व आर्थिक लाभ द्यावेत, असे या प्रस्तावात नमूद केले आहे. बचत गटांना मानधन वाढवून देण्याचा वादग्रस्त ठराव येणार आहे.
आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून मजूर घेऊन बचत गटांचे काम सुरू असल्याने प्रशासनाला डबल भुर्दंड सहन करावा लागतोय. २४ कोटी रुपयांच्या शासकीय अनुदानात १ कोटी ६७ लाख रुपयांचा अपहार झाल्याबद्दल उपअभियंता एस. पी. खन्ना यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव प्रशासनातर्फे ठेवला आहे. या प्रस्तावावरून बरीच ओरड होणार आहे.