औरंगाबादमध्ये अखेरच्या टप्प्यात शासकीय तूर खरेदीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 07:07 PM2018-02-03T19:07:32+5:302018-02-03T19:08:31+5:30
तूरीचा हंगाम संपत आला असताना आज जाधववाडीत शासकीय तूर खरेदीला सुरुवात झाली. नमनाला आलेले १५ क्विंटल तूरीपैकी १३ क्विंटल तूरीत आद्रता १३ टक्के भरल्याने त्या तूरी खरेदी करण्यात आली नाहीत. केवळ एफएक्यू दर्जाची २ क्विंटल तूरी खरेदी करण्यात आली.
औरंगाबाद : तूरीचा हंगाम संपत आला असताना आज जाधववाडीत शासकीय तूर खरेदीला सुरुवात झाली. नमनाला आलेले १५ क्विंटल तूरीपैकी १३ क्विंटल तूरीत आद्रता १३ टक्के भरल्याने त्या तूरी खरेदी करण्यात आली नाहीत. केवळ एफएक्यू दर्जाची २ क्विंटल तूरी खरेदी करण्यात आली.
यंदा बोनससह ५४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. शेतकर्यांची आॅनलाईन नोंदणी सुरु केली पण खरेदी सुरु न झाल्याने शेतकर्यांना आडत बाजारात ४३०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटलने तूर विकावी लागली. तूरीचा हंगाम संपत आल असतानाही शासकीय तूर खरेदी केंद्र सूरू न झाल्याने राज्य शासनावर चोहीबाजूने टिका होऊ लागली. अखेर शासनोन तूर खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले. जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत आज नाफेडच्या वतीने तूर खरेदी केंद्र सुरु झाले. याचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती भागचंद ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तूर खरेदी केंद्रावर २४९ शेतकर्यांनी आॅनलाईन नावनोंदणी केली आहे. सर्व शेतकर्यांना कोणत्या दिवशी केंद्रावर तूर विक्रीला आणायची त्याचे मेसेज पाठविले जात आहे. हमीभाव मिळण्यासाठी शेतकर्यांना एफएक्यू दर्जाची तूर आणणे आवश्यक आहे. यावेळी संचालक, शेतकर्यांची उपस्थिती होती.
औरंगाबादपेक्षा जालना कृउबाचा उत्तम विकास
विधानसभाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले की, औरंगाबाद पेक्षा जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास उत्तम झाला आहे. येथे मात्र, जिल्हा न्यायालयापासून ते सर्वाच्च न्यायालयापर्यंत बाजार समितीसंदर्भातील असंख्य याचिका प्रलंबीत आहेत. यामुळे येथील विकासकामाला ब्रेक लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आठवडाभरात मिळेल मास्टर प्लॅनला मंजूरी
बाजार समितीच्या मास्टर प्लॅनला आठवड्याभरात मंजूरी मिळणार आहे. त्यानंतर जालनाचा धर्तीवर येथील मोंढ्याची स्थलांतराची प्रक्रिया सुरुवात करण्यात येईल,अशी घोषणाही हरिभाऊ बागडे यांनी यावेळी केली.
आडत बाजारात ५० हजार क्विंटल तूर खरेदी
डिसेंबरच्या १५ तारखेपासून ते ३ फेब्रुवारीपर्यंत आडत बाजारात ५० हजार क्विंटल तूर खरेदी झाली. दररोज हजार ते दिड हजार क्विंटल तूर विक्रीला येत होती. आता हंगात संपुष्टात आला आहे.