'..अन् सरणावरील आई जिवंत झाली'; शेवटच्या विधीत पाणी पाजताना अचानक पापणी हलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 12:24 PM2021-08-03T12:24:56+5:302021-08-03T12:26:39+5:30
कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील जिजाबाई वाल्मिक गोरे (९०) यांचे सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास निधन झाले होते.
कन्नड ( औरंगाबाद ) : मयत झालेल्या वृद्ध आईला रूढी परंपरेनुसार सर्व विधी पार पाडून तिरडीवर ठेऊन स्मशानभूमीत नेण्यात आले. तिथे प्रेत सरणावर ठेवल्यानंतर शेवटचा विधी पार पाडणार, तोच अचानक प्रेताची पापणी हलली. त्या पाठोपाठ हाताची हालचाल झाल्याने वृद्धेस सरणावरून काढून तातडीने कन्नडच्या खासगी रुग्णालयात आणण्यात आले.
कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील जिजाबाई वाल्मिक गोरे (९०) यांचे सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास निधन झाले होते. नातेवाईक आणि आप्तेष्टांना ही बातमी समाजमाध्यम आणि फोनद्वारे कळविण्यात आली. सर्व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठीही जमले. रूढी परंपरानुसार अंघोळ घालून प्रेत तिरडीवर ठेऊन स्मशानात नेण्यात आले. रात्री साडेनऊच्या सुमारास लाकडाने रचलेल्या सरणावर प्रेत ठेवण्यात आले. प्रेत लाकडांनी झाकण्यात आले. पाणी पाजण्यासाठी चेहरा फक्त उघडा ठेवण्यात आला होता. या दरम्यान, पाणी पाजण्याच्या वेळी जिजाबाईची पापणी हलली. त्या पाठोपाठ हातानेही चालचाल केल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. हे सर्व नातेवाइकांना अचंबित करणारे होते. त्यामुळे नातेवाइकांनी त्या जिजाबाईला सरणावरून तातडीने खाली काढून कन्नडच्या खासगी दवाखान्यात आणण्यात आले. दवाखान्यात जिजाबाईने ङोळे उघडले, हातापायाची हालचाल केली, श्वासोच्छवास व्यवस्थित होता, असे डॉ. मनोज राठोड यांनी सांगितले.
आईला सरणावर ठेवल्यानंतर पाणी पाजताना आईने डोळा उघडला. मी आईच्या तोंडात ठेवलेला विडा काढल्यानंतर तिने घटाघटा पाणी प्यायले. लगेच आईला सरणावरुन काढून कन्नडच्या खाजगी दवाखान्यात आणले. आता आई बोलत असल्याची माहिती त्या म्हातारीचा मुलगा माजी नगरसेवक विलास गोरे यांनी दिली.