मृताची अखेरची इच्छा पूर्ण; अनेक अडचणी असूनही कोरोनाकाळात पहिले देहदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 08:21 PM2020-07-31T20:21:17+5:302020-07-31T20:27:41+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून देहदान झालेले नाही.
औरंगाबाद : वडिलांनी देहदान केलेले. त्यांच्याप्रमाणे मुलानेही देहदान करण्याची इच्छा नातेवाईकांकडे व्यक्त केली होती. दुर्दैवाने मुलाचा गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. मात्र, कोरोनाच्या विळख्याने देहदान करण्यास अनेक अडचणी होत्या. अखेर सर्व अडचणी दूर करून नातेवाईक, आरोग्य यंत्रणेमुळे मृताची अखेरची इच्छा पूर्ण झाली आणि कोरोनाकाळात पहिले देहदान झाले.
विवेक श्रीकृष्ण चोबे (५५, रा. श्रेयनगर), असे देहदान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून देहदान झालेले नाही. खबरदारी म्हणून मृत्यूनंतर देहदान घेण्याचे थांबविण्यात आले होते. विवेक चोबे यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वडिलांप्रमाणे मृत्यूनंतर आपलेही देहदान करावे, अशी इच्छा कुटुंबियांकडे व्यक्त केली होती. कोरोनामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
याविषयी नातेवाईकांनी औरंगाबाद युथ सोशल वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि ‘झेडटीसीसी’चे सदस्य राजेशसिंह सूर्यवंशी यांना माहिती दिली. त्यानंतर खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांचे नेत्रदान केले; परंतु देहदान करण्यासाठी अडचण होती, ती मृत रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, याचे निदान होण्याची. त्यांनी याविषयी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, डॉ. प्रतिमा कुलकर्णी, डॉ. अमरज्योती शिंदे यांच्याशी संपर्क केला. अखेर मनपाच्या पथकाने मृताच्या घरी जाऊन कोरोनाची तपासणी केली. अहवाल निगेटिव्ह आला आणि अखेर घाटीत देहदान झाले. घटीतर्फे नातेवाईकांना देहदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी प्रा. रवी पाटील, प्रा. चंपालाल कहाटे, डॉ. मंगेश मोरे, डॉ. पल्लवी चव्हाण आदी उपस्थित होते.
पहिले देहदान
कोरोनाच्या कालावधीतील पहिले देहदान झाले. त्यासाठी मयताची अँटिजन टेस्ट करण्यात आली. अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे देहदान शक्य झाले. - डॉ. प्रतिमा कुलकर्णी, शरीररचनाशास्त्र विभाग, घाटी
इच्छा पूर्ण करता आली...
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात जाईपर्यंत निधन झाले होते. त्यांच्या इच्छेप्रमाणे देहदान केले. त्यांची इच्छा आम्हाला पूर्ण करता आली, याचे मोठे समाधान आहे. - डॉ. श्रुती चोबे, सून