गतवर्षी ग्रहणाने खंड पडला, यंदा कोजागरीचा उत्साह शिगेला; दूध, केशर विक्रीत मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 03:08 PM2024-10-16T15:08:50+5:302024-10-16T15:10:12+5:30
सर्वसामान्यांमध्ये कोजागरीचा उत्साह असून, शहरात विविध काॅलनींमध्ये नागरिकांनी कोजागिरी साजरी करण्याचे नियोजन केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी खंडग्रास ग्रहणामुळे कोजागरीला मसाला टाकून गरमागरम दूध पिण्याच्या इच्छेवर लगाम घालावा लागला होता. मात्र, दोन वर्षांनंतर यंदा नागरिकांमध्ये कोजागरीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बुधवारी दूध, केशर आणि दूध मसाल्याची विक्री वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांनीही जय्यत तयारी केली आहे.
कोजागरी पौर्णिमा बुधवारी आहे. जिल्ह्यातून आणि परजिल्ह्यांतून दोन ते तीन लाख लिटर दुधाचा पुरवठा होणार आहे. याशिवाय २०० ते ३०० किलो दूध मसाला आणि २ किलो केशर विक्री होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांमध्ये कोजागरीचा उत्साह असून, शहरात विविध काॅलनींमध्ये नागरिकांनी कोजागिरी साजरी करण्याचे नियोजन केले आहे.
रोजच्या पेक्षा १५ लिटर अधिक विक्रीचा अंदाज
दररोज साधारणपणे ३० हजार लिटर दुधाची विक्री होते. काेजागिरीला यंदा १० ते १५ हजार लिटर अधिक दुधाची विक्री होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश पहाडिया यांनी दिली.
२ किलो केशर विक्रीची शक्यता
२१० रुपये प्रति ग्रॅम या दराने केशरची विक्री होते. कोजागिरीला २ किलो केशर विक्रीतून ४ लाख रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. त्याबरोबरच दूध मसाला विक्रीतून १५ लाखांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. १०, २०, ५०, १०० ग्रॅमच्या पाकिटमध्ये दूध मसाला उपलब्ध आहे, अशी माहिती व्यापारी विलास साहुजी यांनी दिली.
बनावट केशर कसा ओळखाल?
वास्तविक केशर पाण्यात विरघळत नाही. तसेच भिजल्यावर सोनेरी-पिवळा रंग सोडतो. तर नकली केशर विरघळतो आणि ताबडतोब रंग सोडतो, अनेकदा पाणी लाल होते. अस्सल केशरला त्याचा रंग येण्यासाठी काही मिनिटे लागतात. अस्सल केशराला किंचित गोड आणि मातीची चव असते. मधासारखा सुगंध असतो. बनावट केशरची चव अनेकदा कडू असते आणि विशिष्ट सुगंध नसतो.