लेटलतीफ डॉक्टरांमुळे रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:03 AM2017-08-04T01:03:57+5:302017-08-04T01:03:57+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज शेकडो गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, बाह्य रुग्ण विभागातील डॉक्टर वेळेवर येत नसल्याने रुग्णांना तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे.
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज शेकडो गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, बाह्य रुग्ण विभागातील डॉक्टर वेळेवर येत नसल्याने रुग्णांना तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. दंतचिकित्सा विभाग वगळता बाह्यरुग्ण विभागातील सर्व कक्षांतील तज्ज्ञांच्या खुर्च्या गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत रिकाम्याच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी चार ते पाच या वेळेत सुरू असतो. गुरुवारी सकाळी नऊ वाजून ३४ मिनिटांना बाह्यरुग्ण विभागातील रूम क्रमांक आठ समोर ५३ रुग्ण रांगेत उभे होते. मात्र, मेडिसीन कक्षातील तज्ज्ञांच्या दोन्ही खुर्च्या रिकाम्याच दिसून आल्या. चौकशी विभागातील कर्मचाºयास विचारले असता, काही डॉक्टर औरंगाबादहून येतात. रेल्वेला उशिर झाला असेल. थोड्याच वेळात डॉक्टर येतील, असे उत्तर मिळाले. परंतु दहा वाजेपर्यंत या कक्षात एकही डॉक्टर आले नाही. रुग्णांची रांग मात्र वाढल्याचे पाहावयास मिळाले.
ओमिओग्राफी कक्षासमोर सहा रुग्ण डॉक्टरांची प्रतीक्षा करताना दिसून आले. कान, नाक, घसा विभागातील डॉक्टरांचा कक्षही रिकामाच होता. पाच महिला रुग्ण या कक्षाबाहेर डॉक्टरांची येण्याची वाट बघत होते. अस्थिरोग विभागासमोर काही वृद्ध रुग्ण डॉक्टरांची प्रतीक्षा करताना दिसून आले. सोनोग्राफी कक्षातील तज्ज्ञ डॉक्टर साडेदहा वाजेपर्यंत रुग्णालात न पोचल्यामुळे गरोदर महिलांना या कक्षासमोर ताटकळत बसावे लागले. परिचारिकांना विचारल्यानंतर थोड्या वेळात डॉक्टर येतील, असे मोघम उत्तर मिळाले. बालरुग्ण कक्षातील डॉक्टरही साडेदहा वाजेपर्यंत कक्षात आलेले नव्हते. त्यामुळे १५ ते २० बालरुग्ण नातेवाइकांसोबत बाहेरील बाकावर बसून होते. कक्षाबाहेर बसलेल्या परिचारिकेने डॉक्टर कधी येतील याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. पहिल्या मजल्यावरील कुष्ठरोग नियंत्रण कक्षातही दहा ते पंधरा रुग्ण डॉक्टरांची प्रतीक्षा करताना दिसून आले. मात्र, दहा वाजेपर्यंत या कक्षात कुणीच आले नव्हते. वैद्यकीय अधिकाºयांच्या दालनासमोर पंधरा ते वीस निराधार महिला डॉक्टर येण्याच्या प्रतीक्षेत सकाळपासून बसून असल्याचे दिसून आल्या. रुग्णालयातील समुपदेशन केंद्र, इंजेक्शन रुम, प्रयोगशाळा, आयुष विभाग, एक्स-रे विभागील बहुतांश कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. दुपारी चार ते पाच या वेळेतील स्थिती काहीशी अशीच होती. साधारणत: साडेदहा वाजेपर्यंत बहुतांश विभागांत डॉक्टर हजर नसल्याचे दिसून आले. दुसरीकडे रुग्णांची रांग वाढत गेली. उशिरा आलेले डॉक्टर दुपारी बारा वाजता निघून गेल्याने काही रुग्णांना उपचाराअभावीच परतावे लागले. हे रोजचेच चित्र असल्याचे एका रुग्णाचा नातेवाइकाने उद्विग्न होत सांगितले. लेटलतिफ डॉक्टर व कर्मचाºयांवर वरिष्ठ डॉक्टरांचे कुठलेच नियंत्रण नसल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून आले.