लोहारा परिसरात अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2017 12:13 AM2017-05-06T00:13:35+5:302017-05-06T00:15:55+5:30
लोहारा : शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह तासभर मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहारा : शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह तासभर मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला.
मागील पाच-सहा दिवसांपासून अवकाळी पावसाने तालुक्यात हजेरी लावली आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. विजेचा कडकडाट व वादळी-वारे वाहू लागले आहे. वादळीवाऱ्यामुळे ग्रामीण भागात घरावरील पत्रे उडून जाण्याच्या घटना घडत आहेत. पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे नंतर मात्र उष्णतेत वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळपासून उन्हाची खूपच तीव्रता होती. अंगातून घामाच्या धारा निघत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले होते. सायंकाळी वातावरणात बदल होऊन सव्वासहाच्या सुमारास शहरासह परिसरात विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसास सुरवात झाली. मध्यम स्वरूपाचा एक तास पाऊस झाला. मागील शनिवारी सलग दोन दिवस वादळी पाऊस तालुक्यातील काही भागांत झाला होता. यात आंबा, द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते. पुन्हा शुक्रवारी वादळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीत अधिक भर पडली आहे. शहरासह हिप्परगा (रवा), नागूर, खेड, कास्ती, बेंडकाळ, मार्डी, नागराळ, मोघा, लोहारा (खुर्द) या भागात रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु होता.