स्वच्छ शहराच्या यादीत लातूर शहर ३१८ व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2017 12:19 AM2017-05-06T00:19:06+5:302017-05-06T00:20:33+5:30
लातूर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात देशातील एक लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात देशातील एक लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यातील निकषाप्रमाणे सर्वात स्वच्छ शहर म्हणून देशातील ४३४ शहरांची निवड झाली असून, त्यामध्ये लातूर शहराने ३१८ वा क्रमांक पटकाविला आहे. स्वच्छता अभियान कालावधीत लातूर मनपाने सात हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले असून, त्याचा वापर सुरू झाल्याने शहर हागणदारीमुक्त झाले आहे.
अपुरे मनुष्यबळ, निधीची कमतरता, सततचा दुष्काळ, अभूतपूर्व पाणीटंचाईला तोंड देत मनपाने स्वच्छतेच्या निकषात आपले स्थान बऱ्यापैकी टिकविले आहे. मनपाकडे असणारा अपुरा कर्मचारी वर्ग, तोकडा निधी आणि सातत्याने तीन वर्षांपासून पाणीटंचाईला तोंड देत हे स्थान मनपाने पटकाविले. सद्यस्थितीत लातूर मनपामध्ये ४५० पदे रिक्त आहेत. मनपाला मिळणारे सहाय्यक अनुदानही बंद झाले आहे. तरीही मनपाने शहरातील नागरिकांच्या सहाय्याने स्वच्छतेत चांगली कामगिरी बजावली आहे. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यात आली असून, सात हजार वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली आहेत. स्वच्छता अभियानाच्या जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या गीताचे राज्यस्तरावर कौतुकही झाले आहे.