लातूर शहर कडकडीत बंद
By Admin | Published: May 6, 2017 12:19 AM2017-05-06T00:19:57+5:302017-05-06T00:20:40+5:30
लातूर : मुंबई-लातूर एक्स्प्रेस लातूरपर्यंतच कायम रहावी, या मागणीसाठी लातूर एक्स्प्रेस बचाव कृती समितीच्या वतीने लातूर बंदचे आवाहन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : मुंबई-लातूर एक्स्प्रेस लातूरपर्यंतच कायम रहावी, या मागणीसाठी लातूर एक्स्प्रेस बचाव कृती समितीच्या वतीने लातूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला शहरातील सर्व व्यापारी आस्थापना, हॉटेल व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वांनीच कडकडीत बंद पाळून मुंबई-लातूर एक्स्प्रेसच्या बीदरपर्यंतच्या विस्तारीकरणाला तीव्र विरोध दर्शविला.
पोलीस प्रशासनाने शहरात तगडा बंदोबस्त ठेवला होता. बंद शांततेत यशस्वी झाला असून, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र काही तास बससेवा बंद होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. २६ एप्रिलपासून लातूर-मुंबई एक्स्प्रेसचे बीदरपर्यंत विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे लातूर परिसरातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांची सोय व्हावी म्हणून मुंबई-लातूर एक्स्प्रेस लातूरपर्यंतच कायम रहावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शुक्रवारी शहरातील आडत बाजार, शाळा-महाविद्यालये, सराफा बाजार, हॉटेल, दुकाने बंद होती. सकाळी ८ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत मध्यवर्ती बसस्थानकातून एकही बस सोडण्यात आली नव्हती. लातूर शहरात कार्यकर्ते बंदचे आवाहन करीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, शेतकरी कामगार पक्षाचे अॅड. उदय गवारे, नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, स्थायी समितीचे माजी सभापती विक्रांत गोजमगुंडे, दत्ता मस्के, शंकर गुट्टे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रफिक सय्यद, डॉ. विजय अजनीकर, अॅड. गोपाळ बुरबुरे, श्रीकांत रांजणकर, अशोक देडे, महाराष्ट्र विकास आघाडीचे शहराध्यक्ष इस्माईल फुलारी, आनंद वैरागे, असिफ बागवान, नगरसेवक कैलास कांबळे, नगरसेवक गौरव काथवटे, ‘लष्कर-ए-भीमा’चे रणधीर सुरवसे, रघुनाथ मदने, लोकसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस मुस्तफा शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील, नामदेव जाधव, अभिलाष पाटील आदींना पोलिसांनी काही काळ ताब्यात ठेवले. तर शिवाजी चौकात शिवाजीनगर पोलिसांनी सोनू डगवाले, भगवान माकणे, माधव गंभिरे, प्रशांत पाटील, प्रशांत घाटोळे, अजय पाटील, विजय ढोबळे, संकेत उटगे, सूरज पांचाळ, पवन पाटील, शिवकुमार पांचाळ, अॅड. अजित चिखलीकर यांना अटक केली.
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुकाने, छोट्या व्यावसायिकांनी बंद पाळला. मोठे मॉल मात्र चालूच होते. बंद करायला कोणी आले नसल्यामुळे मॉल असल्याची प्रतिक्रिया संबंधित मॉलमधील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. लातूर एक्स्प्रेस बीदरपर्यंत वाढविण्यात आल्यामुळे लातूरच्या प्रवाशांना जागा मिळत नाही. हा गेल्या सहा दिवसांचा अनुभव आहे. अनेकांनी तिकीट काढून देखील जागा मिळाली नाही. दरम्यान, वाढते प्रवासी लक्षात घेऊन खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी आता दुप्पट तिकीट आकारणी चालू केली आहे. याचा विचार करता मुंबई-लातूर एक्स्प्रेसचे विस्तारीकरण रद्द करून ती लातूरपर्यंतच ठेवावी, अशी मागणी लातूर रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
शिवाजी चौक ते संविधान चौक, शिवाजी चौक ते राजीव गांधी चौक, शिवाजी चौक ते गंजगोलाई, रेणापूर नाका आदी भागांतील सर्व दुकाने व्यापाऱ्यांनी स्वत:हून बंद केली. शहरातील गंजगोलाई परिसरातील मार्केट, सराफा बाजार, कापड लाईन, भुसार लाईन, स्क्रॅप मार्केट, मार्केट यार्ड आदी महत्त्वाच्या बाजारपेठा सायंकाळी ५ वाजेपर्यंत कडकडीत बंद होत्या. विशेष म्हणजे पोलिसांनी बंदचे आवाहन करणाऱ्या कार्यकर्त्यांना सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतल्याने बंदचे आवाहन करताना कार्यकर्ते रस्त्यावर दिसले नाहीत. तरीही दुकानदार, व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून लातूर एक्स्प्रेसच्या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शविला.