ग्रामविकासात लातूर पॅटर्न

By Admin | Published: August 17, 2014 12:30 AM2014-08-17T00:30:22+5:302014-08-17T01:04:39+5:30

लातूर : महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रांत विकास साधत आघाडी घेतली आहे. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये लातूर जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे,

Latur Pattern in Rural Development | ग्रामविकासात लातूर पॅटर्न

ग्रामविकासात लातूर पॅटर्न

googlenewsNext




लातूर : महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रांत विकास साधत आघाडी घेतली आहे. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये लातूर जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलावर पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर राज्यमंत्री अमित देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, आमदार वैजनाथ शिंदे, महापौर स्मिता खानापुरे, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, सामाजिक, राजकीय, साहित्य, संस्कृती अशा विविध क्षेत्रांत प्रगती करीत देशाच्या विकासात राज्याने सिंहाचा वाटा उचलला आहे. लातूरचे भूमिपुत्र पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री आ.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या दूरदृष्टी व अथक प्रयत्नाने जिल्ह्याने यशाची शिखरे गाठली आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे राज्यात पिके व पाणीसाठ्याचा प्रश्न उद्भवला आहे. या टंचाईचा सामना करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदानाच्या मूलभूत हक्कांबाबत जागरुक राहून मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा पात्र गरजूंनी लाभ घेत राष्ट्र व राज्य निर्माणाच्या कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांना गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक वनीकरण, बॉम्बशोध नाशक पथक, अग्निशमन दल, आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन आदी विभागांनी तयार केलेले चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते. कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)



‘ पाणी साठवा, गाव वाचवा’ही योजना नुकतीच शासनाने सुरू केली आहे. या अंतर्गत भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यात २ लाख ४४ हजार ३९१ गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना १२२ कोटी ५० लाख रुपये अर्थसहाय्यक दिले आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १४५ कोटी, अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत ७५ कोटी ५९ लाख आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत २ कोटी ७१ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात १६ लाख ७९ हजार ७५१ नागरिकांना लाभ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विविध विभागातील चांगल्या कामाचे कौतुक केले.

Web Title: Latur Pattern in Rural Development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.